पिंपरी : लोकशाहीच्या परीक्षेत यंदा डिस्टिंक्‍शनच!

जनजागृतीवर मोठा भर : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न


अमरसिंह भातलवंडे

पिंपरी – जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची परीक्षा म्हणजेच निवडणुका. या निवडणुकीत मतदानाचा टक्‍का वाढवून डिस्टिंकशन मिळवण्याचा निवडणूक विभागाचा प्रयत्न राहणार आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा घसरलेला टक्का वाढवण्यासाठी यंदा निवडणुकीत प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीची मागील दोन निवडणुकांची टक्केवारी पाहता आधी सेकंड क्‍लास आणि नंतर फर्स्ट क्‍लास मिळवला आहे. आता, कुठल्याही परिस्थितीत 75 ते 80ही टक्‍केवारी गाठून डिस्टिंक्‍शन मिळवायचेच या इराद्याने सध्या प्रशासनाची यंत्रणा काम करीत आहे. मतदार संघात ईव्हीम मशीच वापराची माहीती, मेळावे, पथनाट्य या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले जात असून आता एनजीओ संस्थाही मदतीला आल्याने या निवडणुकांत मतदानाचा टक्का नक्की वाढेल, असा विश्‍वास प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये मतदानाची टक्‍केवारी सुधारलेली नव्हती. शिरुर लोकसभा मतदार संघात 2009 साली 51.44 टक्के तर 2014 साली 59.73 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2009 साली केवळ 44.71 टक्के तर 2014 साली 60.11 टक्के मतदान झाले होते. 2009 च्या तुलनेत 2014 साली दोन्ही मतदार संघात मतदानाची टक्केवारी गाठून प्रशासनाने फर्स्ट क्‍लास मिळवला होता. मात्र, या निवडणुकात मतदानाच्या टक्‍केवारीमध्ये 15 ते 20 टक्‍यांनी वाढ करण्याच्या हेतुने मागील काही दिवसांपासून प्रशासन कामाला लागल्याचे दिसत आहे. कुठल्याही परिस्थिती या वेळी 75 टक्के म्हणजेच डिसिंटक्‍शन मिळवण्याच्या हेतुने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत. मतदार जनजागृतीचा कार्यक्रम होती घेताना दोन्ही मतदारसंघामध्ये मेळावे, पथनाट्य, आणि पोस्टरबाजीतून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या प्रक्रियेसाठी विधानसभा मतदारसंघानिहाय अधिकाऱ्यांचे विविध गट तयार करुन त्या मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीच तसेच बॅलेट पेपरची माहिती देण्याचे काम सुरु आहे. या बरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जागोजागी पथनाट्यही सादर करण्यात येत आहेत. तसेच मतदार जागृती फेरी, महिला मेळावे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांना मतदारांना मतदान करण्यासाठी मार्गदर्शन करावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.

“मागील निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. आता निवडणुका तोंडावर आल्यावर प्रत्यक्ष जनजागृती तसेच महिला, अपंग, तसेच इतर मतदारांचे मेळावे घेऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी निश्‍चित वाढेल.
-संदीप खोत, मतदार नोंदणी अधिकारी

जिथे टक्‍केवारी कमी, तिथे विशेष प्रयत्न

पिंपरी-चिंचवड शहराचा सहभाग असलेल्या दोन्ही मतदान क्षेत्रामध्ये यावर्षी 75 ते 80 टक्के ही मतदानाची टक्केवारी गाठायचीच या इराद्याने प्रशासनाच्या वतीने काम करण्यात येत आहे. प्रसंगी एनजीओ संस्थांचीही मदत घेण्यात येत असून या संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. मागील निवडणुकांमध्ये ज्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी कमी होती, त्या मतदान केंद्राच्या परिसरात जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे, प्रशासनाचे अधिकारी करीत असलेल्या या प्रयत्नांना या निवडणुकांमध्ये यश येणार का? हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)