परीक्षेच्या काळात अतिरिक्त काम : अपुऱ्या कर्मचारी संख्येने ताण
632 शाळा, 35 कर्मचारी
पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या 105 शाळा व खासगी 527 शाळा आहेत. या शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या शिक्षण विभागाची आहे. शिक्षण विभागात एकूण सुमारे 35 कर्मचारी आहेत. परीक्षा आणि प्रवेशांच्या काळात शिक्षण विभागाचे काम आणखी वाढते. त्यातच सध्या आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाचे काम सुरू आहे. अशा कामाच्या धांदलीत 35 पैकी सुमारे 13 ते 14 कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यामुळे उर्वरीत 20 ते 21 कर्मचाऱ्यांना सुमारे दीड महिना शिक्षण विभागाचा गाडा खेचावा लागणार आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभाग पूर्ण कार्यक्षमतेने काम करु शकेल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पिंपरी – प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. या परिक्षांची तयारी महापालिकेचा शिक्षण विभाग करत असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. या निवडणुकांमुळे शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपले आहेत. या विभागात अगोदरच अपुरी कर्मचारी संख्या असल्याने कामाचा पूर्वीपासूनच ताण आहे. त्यात आता निवडणुकांच्या कामात मनुष्यबळ लागले असल्याने अतिशय थोड्या कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभागाचा गाडा खेचण्याची जबाबदारी आली आहे.
शहरातील सुमारे 630 शाळांची जबाबदारी असलेलया अवघ्या 35 कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी आता निवडणुकीची कामे करत आहेत. त्यात निवडणुका व परीक्षांचे काम एकत्रितपणे सुरु झाल्याने शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची चांगली धांदल उडाली आहे. यामुळे, लोकसभा निवडणुकांनी शिक्षण विभागाची दमछाक केली आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागली आणि सोबतच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामे देण्यात आली. शिक्षण विभागातील उपलब्ध कर्मचाऱ्यांवर निवडणुकीच्या कामांची जबाबदारी आल्याने निवडणुका व शैक्षणिक काम अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत आहेत.
लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम 23 मे पर्यत चालणार आहे.
या निवडणुका जाहीर झाल्याने प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना विविध कामांची जबाबदारी दिली जाते. परंतु, या कामामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील दैनंदिन कामांवर परिणाम होताना दिसत आहे. शिक्षण विभागात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक कामे खोळबंलेली दिसतात. आता कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी जुंपल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कामाच्या बोजवारा उडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
लोकसभा निवडणुका व शालेय परीक्षा सलग आल्याने कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामे व शिक्षण विभागातील कामे करताना कसरत करावी लागत आहे. निवडणुकीचे काम सक्तीचे असल्याने ते करणे आवश्यक आहे. यामुळे, शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी निवडणुकीच्या धावपळीत असल्याचे चित्र शिक्षण विभागात दिसत आहे. परंतु, निवडणुकीच्या कामामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी अपेक्षा आता शिक्षक आणि पालक व्यक्त करत आहेत.