मराठीची गोडी वाढविण्यासाठी ‘स्वाधार’

महापालिकेच्या 28 शाळांमध्ये उपक्रम : मनोरंजनातून शिक्षण देण्याचा प्रयत्न

खासगी 25 शाळांमध्येही उपक्रम

पहिली ते चौथीच्या मुलांचे सामूहिक वाचन, पुस्तकातील एखादी गोष्ट वाचून त्यातील जोड्या लावणे, चित्रांमध्ये रंग भरणे आदी प्रकारचे छोटे छोटे खेळ घेऊन मराठी भाषेचा रस वाढविला जातो. तसेच पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या सोबतच प्रदूषण, फळ, झाडांची, पक्षांची तसेच थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथीबाबत माहिती देणारे पुस्तक देऊन त्यांना ते वाचण्यासाठी आठवड्याचा कालावधी दिला जातो. महापालिकेच्या 28 शाळा तर खासगी 25 शाळांमध्ये स्वाधार संस्था हा उपक्रम राबवत आहे.

दापोडी – मातृभाषेवर प्रेम वाढावे, महापालिकेच्या शाळेत मुलांची संख्या वाढावी यासाठी स्वाधार ही संस्था महापालिकेच्या शाळांमध्ये जात पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त मनोरंजनात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लावत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये झोपडपट्टी परिसरातील, गरीब घरातील मुले शिकतात. बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अवांतर पुस्तकांचे वाचन करायला मिळत नाही. त्यासाठी स्वाधार संस्थेने पुढाकार घेतला आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये देखील “स्वाधार’ हा उपक्रम राबवून मुलांना मराठी कथा, कादंबऱ्या, व्यक्ती चरित्र आदी पुस्तके उपलब्ध करून देऊन त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

इंग्रजीच्या वाढत्या महत्त्वामुळे मध्यम वर्गातील पालक देखील पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठवत आहेत. याचा फटका प्रामुख्याने महापालिकेच्या मराठी शाळांना बसला आहे. यामुळे महापालिका शाळांचे एकत्रीकरण करण्यात आले. काही शाळा बंद देखील करण्यात आल्या. मराठी शिक्षणाकडे कल वाढविण्याचा हेतू यामागे आहे. प्रामुख्याने अगदी गरीब घरातील तसेच अनाथ आश्रमातील मुले महापालिका शाळेत सध्या शिकताना दिसत आहे.

या मुलांचे एका चाचणीद्वारे मराठी भाषेबद्दलचे आकलन करून त्यांच्या आवडीप्रमाणे मराठी पुस्तके दिली जातात. त्याचप्रमाणे 90 मिनिटाच्या प्रत्येक तासामध्ये “स्वाधार ताई’ सर्वप्रथम प्रार्थना त्यानंतर 45 मिनिटे वाचन, गोष्ट, भाषिक खेळ असे उपक्रम घेत अभ्यासाची आवड निर्माण करतात, अशी माहिती “स्वाधार’च्या स्वाती कानेकर यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)