अवघड सुळके : “सागरमाथा’च्या गिर्यारोहकांची मोहीम

सरसगडच्या घेऱ्यातील दोन सुळके सर

भोसरी – येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या सहा सदस्यांनी पाली (ता. रायगड) येथील सरसगडच्या घेऱ्यातील दोन अवघड सुळके सर केले. पाली गावाला लागूनच असलेल्या सरसगडच्या घेऱ्यात, गडाच्या पूर्वेकडे एकमेकांच्या शेजारी तीन सुळके आहेत. त्यांना पूर्वेकडून अनुक्रमे जीएस-1, जीएस-2 व जीएस-3 संबोधले जाते. जीएस-1 हा सुळका इतरांच्या तुलनेत अवघड आहे. नीलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्यवान शिरसाट, शरद पवळे, अनिल पवळे, लखन घाडगे व निकेश रासकर यांनी मोहीम यशस्वी केली, अशी माहिती संस्थापक सचिव प्रशांत पवार यांनी दिली.

सागरमाथाचे सदस्य जीएस – 1 व 2 या दोन सुळक्‍यांच्या मधल्या खिंडीत पोहोचले. सर्व तयारी करून साडेअकराला लखन घाडगे यांनी आरोहण मार्गाचे पूजन केले. नीलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरोहणास सुरुवात झाली. जीएस-1च्या आरोहणाची जबाबदारी शरद पवळे व सत्यवान शिरसाट यांनी स्वीकारली, तर जीएस-2च्या आरोहणाची जबाबदारी अनिल पवळे व लखन घाडगे यांनी स्वीकारली. दीड तासाची सावध चढाई करीत अनिलने 110 फुटांवरील जीएस-2 सुळक्‍याचा माथा गाठला. सुरक्षिततेसाठी आरोहण मार्गात एका ठिकाणी फ्रेंड व दोन ठिकाणी झुडपाच्या बुंध्यांचा वापर करण्यात आला. अनिल पाठोपाठ लखन व नीलेश यांनीही माथा गाठला.

जीएस-2 वर शरद व सत्यवान यांची चढाई सुरू होती. 90 फुटांवर पहिले स्टेशन करून पुढील आरोहण सुरूच होते. हा सुळका तुलनेने उंच व अवघड असल्याने मार्गात दोन पिटॉन, एक मेख व दोन ठिकाणी नवे बोल्ट ठोकावे लागले. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी दोनला शरद 200 फूट उंचीच्या जीएस-1 सुळक्‍याच्या माथ्यावर पोहोचला व माथ्यावरील झाडाला रोप बांधला. बांधलेल्या रोपवरून अनुक्रमे सत्यवान, लखन, अनिल व निकेश यांनीही सुळक्‍याचा माथा गाठला. संपूर्ण मोहिमेत निकेश रासकर यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली. ज्येष्ठ गिर्यारोहक सचिन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)