पिंपरी : …तर प्रकल्पांसाठी जागा नाही!

दत्ता साने यांचा विरोध : भूमिपुत्रांना आवाहन करणार

…अन्यथा न्यायालयात दाद मागणार

शहरातील सर्वसामान्य नागररिकांच्या भावनांचा विचार करुन प्रस्तावित भोसरी रुग्णालय खासगी तत्वावर देण्याचा निर्णय रद्दबादल करण्यात यावा. यामुळे शहरातील वैद्यकीय उपचार महागणार असून, ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. निर्णय रद्द न झाल्यास या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही साने यांनी दिला आहे.

पिंपरी – वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेला भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली असून, 2019-20 या शैक्षणिक वर्षांपासून सात विषयांसाठी 24 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कामगिरीसाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, भोसरी रुग्णालय खासगी संस्थेला देण्यास विरोध कायम असल्याचे सांगत, महापालिकेच्या कोणत्याही विकासकामाला अथवा प्रकल्पाला जागा न देण्याचे भूमिपुत्रांना आवाहन करू,अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

याबाबत महापालिका आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात साने यांनी म्हटले आहे की, या वैद्यकीय संस्थेमध्ये कान-नाक-घसा, मानसोपचार, स्त्री रोग व प्रसूती आणि विकृतीशास्त्र, भूलशास्त्र, बालरोग, अस्थिरोग या विषयांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तीन वर्षाचा अभ्यासक्रम असल्यामुळे तीन वर्षात 72 डॉक्‍टर उपलब्ध होतील. तसेच औषध वैद्यक, शल्यशास्त्र आणि क्ष किरण या तीन विषयांसाठी परवानी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, अशा प्रकारची वैद्यकीय पदव्युत्तर संस्था प्रस्तावित करुन परवानगी मिळवणारी देशातील पहिली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ठरली आहे. याबद्दल साने यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

ही पदव्युतर वैद्यकीय संस्था सुरू झाल्यामुळे दोन-तीन वर्षांत महापालिकेला वेगवेगळ्या वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावणार आहे. परिणामी भोसरी रुग्णालय खाजगी तत्वावर देण्याचे कोणतेही प्रयोजन उरत नाही, अशी भूमिका व्यक्‍त केली आहे. तर सत्ताधारी भाजपाने प्रस्तावित असलेले भोसरी रुग्णालय खाजगी तत्वावर देण्याचा विषय महापालिका सभेमध्ये मंजूर केलेला आहे. तो विरोधाभास आहे. तसेच त्या निर्णयामध्ये महापापलिका आयुक्‍त देखील सहभागी आहेत की काय, अशी शंका उपस्थित केली आहे.

या खासगीकरणामुळे शहरातील सुमारे 25 ते 30 लाख गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा रास्त दरात उपलब्ध होणार नाही. त्यामुळेच शहरातील प्रत्येक भागातून भोसरी रुग्णालय खाजगीकरणाच्या विरोधातील सर्वसामान्य जनता आंदोलने करत आहेत. भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. भोसरी रुग्णालय खाजगीकरणाचा निर्णय रद्द न झाल्यास आम्ही स्थानिक भूमिपुत्रांना यापुढे त्यांच्या जमिनी महापालिकेस देण्यात येऊ नये, असे जाहीर आवाहन करू. भूमिपुत्रांनी त्यांच्या जमिनी कवडीमोल दराने महापालिकेच्या वेगवेगळ्या आरक्षणांसाठी द्यावयाच्या व महापालिकेने त्या जागेवर इमारती बांधून त्या खाजगी ठेकेदारांच्या घशात घालायच्या, असे यापुढे चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)