…तर भाजपने सत्तेचे स्वप्न पाहणे सोडावे!

पडळकरांचा इशाराः “अखेरचा लढा, धनगर समाजाचा’ आंदोलन

पिंपरी  -येत्या 25 फेब्रुवारी रोजी धनगरांच्या मुलांच्या हातात एस.टी. आरक्षणाचा दाखला मिळाला नाही, तर भारतीय जनता पक्षाने सत्तेत यायचे स्वप्न पाहणे सोडावे. धनगर समाज घोडी-मेंढरासह मुंबईत चक्काजाम आंदोलन करेल, असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. केवळ धनगर समाजाच्या मतांमुळे भाजप सरकार सत्तेवर आले. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला जागा दाखविण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. सरकार आता फसवू शकत नाही, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकल धनगर समाज, पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित धनगर आरक्षण जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान, काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पडळकर म्हणाले, की घटनेत तरतूद असतानाही गेली सत्तर वर्षे आरक्षण मिळाले नाही. आता येत्या 24 फेब्रुवारी रोजी मुख्यमंर्त्र्यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला परिपत्रक पाठवून धनगर आणि धनगड्‌ हे दोन शब्द एकच असल्याचे सांगून एसटी आरक्षणाचा दाखला द्यायला सांगण्यात यावा. अन्यथा 25 फेब्रुवारीनंतर धनगरांची धग मुंबईकरांना लागल्याशिवाय राहणार नाही. 25 फेब्रुवारीनंतर धनगर समाज घोडी मेंढरासह मुंबईत चक्काजाम आंदोलन करेल. धनगर समाजात फार मोठी शक्ती आहे. पिपरी चिंचवड शहरात यापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपने सत्ता हस्तगत केली. पण हीच सत्ता येत्या निवडणुकीत धनगर समाज हालवूही शकतो.

यावेळी बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, राजकारणात सध्या घराणेशाहीचे वारे सुरू आहे. मात्र, राजकारणातील घराणेशाही संपून सर्वसाधारण माणूस सत्तेत यायला हवा, तेव्हाच राज्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनावर विश्‍वास ठेऊन धनगर समाजानेही गत निवडणुकीत भाजपला साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)