पुन्हा धावू लागली “शिवशाही शयनयान’

पिंपरी – राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस. टी. महामंडळाने वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरामध्ये कपात केली आहे. त्यामुळे वल्लभनगर आगाराने बंद केलेली शिवशाही शयनयान बस पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

दरकपात येत्या 13 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. राज्यातील दुष्काळसदृश्‍य परिस्थिती, खासगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषीत केले आहे. 230 ते 505 रूपये एवढी कपात करण्यात आली आहे.

यापूर्वी वल्लभनगर आगारातून शिवशाही शयनयान ही बस वल्लभनगर ते नागपूर या मार्गावर धावत होती. मात्र, प्रवाशांना तिकीटभाडे परवडत नसल्याने प्रवासी बसकडे पाठ फिरवत होते. त्यावर बसचे अंतर कमी करण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यामुळे ही बस अकोलापर्यंत धावत होती. परंतु, त्याला सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी ही बस बंदच करण्यात आली होती. मात्र, आता तिकीट तरात कपात करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल या आशेने रविवार (दि. 10) पासून पुन्हा वल्लभनगर ते अकोला ही बस सुरू करण्यात आली असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली.

शिवशाही शयनयान बसमध्ये 30 आसन क्षमता असून एका प्रवाशाला पिंपरी-चिंचवड ते अकोला दरम्यान प्रवासासाठी 1 हजार 40 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता तिकीट कपातीमुळे 13 फेब्रुवारीपासून 340 रुपये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा बससेवेला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा एस. टी. प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

वल्लभनगर आगारातून पूर्वी सुरू असलेल्या वल्लभनगर ते नागपूर शिवशाही शयनयान बसला प्रतिसाद नसल्याने अकोलापर्यंत ही सेवा सिमीत करण्यात आली होती. मात्र, तिला सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याने काही दिवस बस बंद करण्यात आली होती. आता तिकीट दर कपात झाले असल्याने नक्कीच प्रवासी क्षमता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे नव्याने बस सुरू करण्यात आली आहे.
– संजय भोसले, वल्लभनगर एस. टी. आगार प्रमुख.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)