संतपीठावरून राष्ट्रवादीत मतभेद

स्थायीतील “मौनी’ नगरसेवकांची तक्रार : पक्षश्रेष्ठींकडे केली कारवाईची मागणी

‘ऑडिओ क्‍लिप’ महासभेत वाजवणार

संतपीठाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी सरसावले असून, त्यामध्ये सहयोगी आमदार महेश लांडगे यांचा राष्ट्रवादीच्या काळातील केवळ तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष एवढ्यापुरताचा सहभाग आहे. तर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांना तर संतपीठ नेमके कोणत्या प्रभागात प्रस्तावित आहे, याची देखील माहिती नाही, अशी टीका दत्ता साने यांनी केली. किमान देवा-धर्माच्या विषयात तरी राजकारण करू नका, असा सल्ला साने यांनी सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. संतपीठाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. मात्र, संतपीठाच्या कामात “रिंग’ झाली आहे. “रिंग’ करुनच वाढीव खर्चाची निविदा भरण्यात आली असून त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. आता ही “रिंग’ झाल्याची “ऍडिओ क्‍लिप’ महासभेत वाजवून भाजपला भ्रष्टाचाराचा पुरावाच देणार असल्याचा इशारा साने यांनी दिला आहे.

पिंपरी – चिखली येथील प्रस्तावित संतपीठ उभारणीच्या पाच कोटी वाढीव खर्चाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समितीत मौन बाळगणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार नगरसेवकांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी गुरुवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत दिली. एकीकडे या विषयावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करत असतानाच, राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य मात्र मौन बाळगून असल्याने अपेक्षित दबाव निर्माण करू शकत नसल्याचे साने यांनी हे पाऊल उचलले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे, नगरसेविका गीता मंचरकर आणि प्रज्ञा खानोलकर हे चार नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य आहेत. या चार नगरसेवकांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते या नगरसेवकांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतपीठासाठी महापालिकेने 40 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या. त्याला पाच कोटी वाढीव रुपये देण्यात आले. असे एकूण 45 कोटीच्या प्रस्तावाला 21 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या वाढीव खर्चाच्या प्रस्तावावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते.

परंतु, त्यांनी स्थायी समितीमध्ये मौन बाळगले. स्थायी समितीची सभा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संतपीठाचा विषय तहकूब केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र हा विषय मंजूर करण्यात आला होता. स्थायी समितीत विषय तहकूब केल्याचे सांगितल्यानंतर मंजूर कसा केला? यावर राष्ट्रवादीच्या स्थायीतील नगरसेवकांनी त्यानंतर ब्र शब्द देखील काढला नाही. आवाज उठविला नाही. शांत राहणेच पसंत केले. त्यामुळे त्यांच्या भुमिकेविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला होता.

यावर दत्ता साने म्हणाले की, स्थायी समितीमध्ये संतपीठाच्या विषयावर भुमिका न घेणाऱ्या पक्षाच्या चार नगरसेवकांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन पक्षाचे नेतृत्व योग्य ती कारवाई करतील.

…हे तर भाजपचे अपयश

राष्ट्रवादीची सत्ता असताना समिती स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या समितीवर चिखली गावातील नागरिक, आळंदी, देहूतील अभ्यासू व्यक्ती व तज्ज्ञांसह महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते आणि स्थानिक नगरसेवक यांना घेण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु, भाजपने त्यामध्ये देखील बदल केला असून आपल्या विचाराच्या लोकांना समितीत समावेश केल्याचा आरोपही, साने यांनी केला आहे. गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असूनही संतपीठासाठी आवश्‍यक असणारी उर्वरित जागा त्यांना दीड वर्षात ताब्यात घेता आली नाही. त्यांचे हे अपयश आहे, असे साने म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)