पिंपरी – पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. पिंपरी ते दापोडी या अंतरातील काम सध्या पूर्ण केले जात आहे. या कामातंर्गत 5 मेट्रो स्टेशन उभारले जात आहे. कामाचा सध्याचा आवाका लक्षात घेता वर्षअखेरपर्यंत हे काम पूर्ण करून शहर परिसरातून मेट्रो धावू शकणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी गुरूवारी (दि. 16) डिजिटल प्रभातला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील विभागीय कार्यालयात आयोजित गणेशोत्सवाला बिऱ्हाडे यांनी भेट दिली. त्या प्रसंगी डिजिटल प्रभातने बिऱ्हाडे यांच्यासमवेत साधलेल्या संवादात त्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमधून वर्षअखेरपर्यंत मेट्रो धावणार असताना पुण्यातही वनाजपासून रामवाडीपर्यंत (कॉरिडोर 2) पूर्व-पश्चिम प्राधान्य मार्गावर वर्षअखेरपर्यंत मेट्रो धावणार आहे.
करोनाचा मधला काही काळ वगळता मेट्रोचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. चिंचवडपासून स्वारगेटपर्यंतच्या (दक्षिण-उत्तर कॉरिडॉर) मेट्रोचे काम सध्या सुरू आहे. चिंचवडपासून रेंजहिलपर्यंतच्या कॉरिडॉरचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, चिंचवडपासून दापोडीपर्यंतचे काम 90 ते 95 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर्षअखेर पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो धावू शकणार आहे.
मेट्रोचे काम पुणे-मुंबई महामार्गावर सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे काम करणे खूप कठीण जाते. दिवसा असलेल्या वाहतूक कोंडीमुळे मेट्रोच्या कामासाठी लागणारी यंत्रसामग्री ने-आण करणे अवघड जाते.
दिवसरात्र काम झाले असते तर मेट्रोचे काम लवकर होऊ शकले असते. करोनाची पहिली लाट आणि त्या पाठोपाठ करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनमुळे मेट्रोच्या कामाला उशीर झाला.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये मेट्रोचे सर्व कामच बंद होते. त्या कालावधीत कामगार गावी परतल्याने कामगारांचीही कमतरता जाणवत होती. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू कामाने वेग पकडला.