लेनमध्ये बेकायदा पार्किंग : बस थांब्यांवर तळीरामांचा अड्डा
पाच वर्षे उलटूनही बस धावेना : काळेवाडी फाटा परिसरात अतिक्रमणांना मोकळे रान
चिंचवड – काळेवाडी फाटा ते एम. एम. सेकंडरी स्कूलपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने बीआरटी रस्ता करून सुमारे पाच वर्षे झाली. परंतु, बीआरटी बस आजपर्यंत धावत नसल्यामुळे कोट्यावधी रूपये धुळीत गेले काय? असा सवाल सर्वसामान्य प्रवासी करीत आहेत.
महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चार ठिकाणी बीआरटी मार्ग तयार केले आहेत. त्यात दापोडी ते निगडी, सांगवी ते किवळे, काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता आणि नाशिक फाटा ते पिंपळे सौदागर या चार मार्गाचा समावेश आहे. त्यातील तीन मार्गावर सध्या बीआरटी सुविधा सुरु करण्यात आली आहे. काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी रस्ता हा मार्ग अद्याप सुरु झालेला नाही.
महापालिकेकडून 2008 सालापासून या कामाला संथगतीनेच सुरूवात करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असलेली दुकाने, घरे यावर नांगर फिरवत बीआरटी मार्ग बांधून झाला. परंतु, बस वाहतूक होणाऱ्या बीआरटी मार्ग खासगी वाहनांसाठी फुकटचे पार्किंग झाले आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून बांधलेल्या बीआरटी बस स्थानकांमध्ये तळीरामांचा अड्डा झालेला आहे.
या मार्गात रात्रीच्या वेळेला तरुणींना छेडछाडीचेही प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीवर विक्री व्यवसाय करणारे, दुकानाबाहेर वस्तू विक्रीला ठेवून पादचारी मार्गावर अतिक्रमण करणारे व्यापारी, खासगी बस आदींमुळे पिंपरी-काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
काळेवाडी फाटा ते एम. एम. सेकंडरी स्कूलपर्यंत रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहन चालक व दुचाकी चालकांचे हाल होत आहेत. औंधकडून काळेवाडीला येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना पदपथ उपलब्ध नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. काळेवाडी फाटा या ठिकाणी वापरासाठी असलेला रस्ता प्रशस्त आहे. मात्र बेशिस्त पार्किंगमुळे या चौकात वाहतूक कोंडी होते. चौकाच्या चारही बाजूंनी बेशिस्त पार्किंग केले जाते. त्याचप्रमाणे रिक्षा रस्त्यावरच लावल्यामुळे चारचाकी वाहनास अडथळा निर्माण होतो.