वैद्यकीय विभागाला ‘सर्जरी’ची गरज

महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राला सध्या आरोप-प्रत्यारोप, बढती मधील राजकारण, औषधांचा तुटवडा, सेवेचे खासगीकरण अशा अनेक कारणांचे ग्रहण लागले आहे. याचा थेट परिणाम रुग्ण सेवेवर होत असून, शहरातील वैद्यकीय सेवेचा दर्जा राखायचा असल्यास या सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दिवंगत माजी शालेय शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या प्रयत्नातून सुरू साकारलेले यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळत असल्याने, शहराबरोबरच जिल्हा व आता राज्यभरातील रुग्ण याठिकाणी उपचारांकरिता येत आहेत. त्यामुळे 250 बेड क्षमतेच्या रुग्णालयाची आता 750 बेड क्षमता करावी लागली आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदाकरिता नेमका पात्र अधिकारी कोण? याचा वाद अद्यापही मिटलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. के. अनिल रॉय यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपविल्यानंतर या पदाचे प्रमुख दावेदार असलेले अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या तक्रारीनंतर याचा निर्णय पुन्हा घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यानंतर डॉ. रॉय यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यानच्या काळात चार महिन्यांपूर्वी डॉ. साळवे यांच्याकडे वायसीएम रुग्णालयाचा संपूर्ण कारभार देत, डॉ. रॉय यांना शह दिला होता.

सध्या भोसरीत नव्याने बांधलेल्या महापालिकेच्या 100 खाटांचे रुग्णालय खासगी तत्वार चालवायला देण्याचे प्रशासनाच्या विचाराधिन आहे. मात्र, शहरातील विविध संघटनांचा या खासगीकरणाला दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. मात्र, हे रुग्णालय खासगी तत्वावर चालवायला दिले तरीदेखील रूग्णसेवा महागणार नसल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.

शहरातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता वैद्यकीय अशिष्ठाता पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली असून, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत:च्या अधिकारात प्रतिनियुक्‍तीवर डॉ. पद्माकर पंडित यांची वर्णी लावली आहे. मात्र. त्यामुळे वायसीएमबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार डॉ. पंडित यांना बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे डॉ. रॉय आणि डॉ. साळवे यांच्या अधिकारांवर गदा आली आहे.

हे दोन्ही अधिकारी आता केवळ शोभेचे बाहुले बनले आहेत. डॉ. पंडित आणि वायसीएममधील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे पटत नसून, यापूर्वीच त्यांची झालेली भांडणे अगदी शिवीगाळीपर्यंत पोचली होती. त्यामुळे डॉ. पंडित यांच्याशी आपले पटणार नसल्याची जाणीव झाल्याने, या वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते.

दरम्यान, डॉ. पंडित यांच्या नियुक्‍तीनंतर डॉ. रॉय आणि डॉ. साळवे यांचे वैद्यकीय विभागातील नेमके स्थान व कामाची विभागणी कशी असेल, याबाबत या अधिकाऱ्यांनाच कल्पना नाही. स्थायी समितीच्या बैठकीत ही बाब उघड झाली आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेली एचबीओटी मशिन पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच महासभेने मान्यता दिली आहे. मात्र, बाजारभावापेक्षा अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्याने ही खरेदी वादाच्या भोवऱ्यात अडकली असून, याप्रकरणी वायसीएममधील डॉ. आनंद जगदाळे आणि डॉ. गायकवाड या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोषी धरले आहे.

स्वाईन फ्ल्यू आणि साथीच्या आजारांनी डोके वर काढल्यानंतर पुरेसा औषध साठा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वैद्यकीय विभाग सोडवू शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मनुष्यबळाअभावी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी परीक्षा घेऊन दीड महिना उलटल्यानंतर देखील परीक्षेचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे मनुष्यबळाची आजही वायसीएममध्ये कमतरता भासत आहे. वैद्यकीय सेवेचे सक्षमीकरण ही काळाची गरज असताना, महापालिकेचा वैद्यकीय विभागाला अनेक समस्यांनी त्रस्त आहे. वेळीच वैद्यकीय विभागावर उपचार करण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)