पिंपरी – क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची पाच लाख 18 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 मार्च 2022 ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत कासारवाडी परिसरात घडली. कुणाल रामदास सुतार (वय 39, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये चांगला फायदा होईल,असे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या माध्यमातून फिर्यादी यांनी पाच लाख 18 हजार रुपये गुंतवणूक केली. मात्र, त्यांना कोणताही परतावा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता अनोळखी आरोपींनी फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.