पिंपरी-चिंचवड विधानसभा : जागावाटपावरून युतीमध्ये कलगीतुरा रंगणार

विधानसभेची लढाई : सेना-भाजपात दावे-प्रतिदावे

पिंपरी – लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्याप बाकी असताना तसेच शिवसेना-भाजपा युतीचे जागावाटप निश्‍चित नसतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात युतीच्या नेत्यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याने कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे. राज्यपातळीवरील जागावाटपात अपेक्षित मतदारसंघ न मिळाल्यास बंडखोरी अन्‌ पक्षबदल होण्याची भाकितेही आतापासून वर्तविली जाऊ लागली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. पिंपरी हा राखीव असून, चिंचवड व भोसरी हे सर्वसाधारण गटासाठी आहेत. सन 2009 साली युतीच्या जागावाटपानुसार चिंचवड आणि भोसरी हे मतदारसंघ शिवसेनेकडे, तर पिंपरीचा मतदारसंघ हा भाजपाकडे होता. मात्र सन 2014 साली युतीमधील शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने चिंचवडमध्ये भाजपाचा तर पिंपरीमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आले होते.

भोसरीमध्ये अपक्ष म्हणून विजयी झालेले महेश लांडगे हे सध्या भाजपाचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे चिंचवड आणि भोसरीवर भाजपाने दावा सांगितला आहे. तर पिंपरीबाबत भाजपा, रिपाइं हे पक्ष आग्रही आहेत. सध्या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने शिवसेनेचा हक्‍क या मतदारसंघावर येत असला तरी भाजपाचे स्थानिक नेते या मतदारसंघाबाबतही आग्रही आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहे. तसेच लोकसभेला युती करतानाच विधानसभेसाठीही 50-50 चा फॉर्म्युला अंमलात आणण्याची घोषणा करण्यात आल्याने शहरातील तीन मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

विधानसभा निवडणुकीला अद्याप चार ते पाच महिन्यांचा कालावधी असतानाही भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांनी आपले कार्यालय सुरू करून विधानसभेची जय्यत तयारी चालविली आहे. भोसरीचा मतदारसंघ भाजपाकडे येणार अशा आशयाचे सूचक वक्तव्य भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केल्यामुळे जागावाटपावरून युतीमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर कोणत्या मतदारसंघात कोणाला मताधिक्‍य मिळाले, यावरून अनेक गोष्टी उजेडात येणार आहेत. त्यावरूनच मतदारसंघाची वाटणी होण्याची शक्‍यता आहे. मात्र सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये असलेली भाऊगर्दी, दावे प्रतिदावे आणि 2009 चे जागावाटप यावरून कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे. उघड आरोप-प्रत्यारोप सुरू झाले नसले तरी लोकसभेच्या निकालानंतर मात्र याला वेग येण्याची शक्‍यता आहे. चिंचवडमधून राहुल कलाटे, पिंपरीतून चंद्रकांता सोनकांबळे, खासदार अमर साबळे आणि भोसरीतून सुलभा उबाळे या कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षादेश मान्य; परंतु चिंचवडवर दावा कायम

चिंचवड विधानसभा मतदारसंघात 2009 आणि 2014 साली शिवसेनेने कडवी लढत दिली होती. या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून आमचा या मतदारसंघावर दावा कायम असल्याचे मत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, चिंचवड हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ असून सध्या या मतदारसंघात भाजपाचे आमदार असले तरी आम्ही स्थानिक पातळीवरून या मतदारसंघासाठी आग्रही आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मतदारसंघातबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मात्र मतदारसंघ शिवसेनेला न मिळाल्यास पुढील दिशा ठरविली जाईल, असेही कलाटे म्हणाले.

शिवसेनेत आदेशाला महत्त्व

भोसरीच्या जागेबाबत माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, सध्या मी घरगुती कार्यक्रमात व्यस्त असून, विधानसभेला अद्याप बराच कालावधी बाकी आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते भोसरीबाबत योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला खात्री असून, आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार चालणारे कार्यकर्ते आहोत. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)