परप्रांतीय, परदेशी नागरिकांची माहिती द्या, चाकण पोलिसांकडून आवाहन

पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचे आवाहन : सावरदरी-वासुली हद्दीतील कंपनीत तातडीची बैठक

महाळुंगे इंगळे – आंतरराष्ट्रीय नकाशावर सातत्याने नाव झळकत असलेल्या चाकण उद्योग पंढरीत कामा धंद्याच्या निमित्ताने वास्तव्यासाठी येणाऱ्या परप्रांतीय अथवा परदेशी नागरिकांची माहिती तात्काळ पोलिसांना द्या, असे आवाहन चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले.

चाकण औद्योगिक परिसरातील वासुली गावच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी एक बांगलादेशी घुसखोर, तर खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीतून काश्‍मीरच्या पुलवामा मधील एक संशयित दहशतवाद्यांचा साथीदार मिळून आल्याने येथील पोलिसांनी खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील सावरदरी-वासुलीच्या हद्दीतील टेट्रापेक कंपनीत तातडीची व्यापक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन, पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल आदींसह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनील पवार म्हणाले की, कारखानदारांनी नियुक्‍त केलेले कामगार ठेकेदारांनी त्यांच्याकडे येणाऱ्या कामगारांची संपूर्ण माहिती घेऊन व त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्या नेमणुका केल्या पाहिजेत. तसेच कामगारांची कसलीही माहिती न घेता कामगार कामावर ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कंपन्यांनी बंधने घालण्याची नितांत गरज आहे. चाकण एमआयडीसी हद्दीमध्ये होणाऱ्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्वच कंपन्यांनी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले पाहिजेत. चाकण एमआयडीसी मधील काही गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात आल्या आहेत.

उद्योजक आणि त्यांच्या प्रतिनिधींनी एमआयडीसी भागात संघटीतपणे दहशत करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांच्यावर कारवाई केल्या जातील. औद्योगिक वसाहतींमधील धाकदपटशा, लुटमार, चोरीच्या घटना घडूच नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरु केले असून, चाकण एमआयडीसीमध्ये दिवसरात्र गस्ती सुरू केल्या आहेत. चाकण भागात लाखो अपरिचित भाडेकरू अद्यापही वास्तव्यास आहेत. पोलिसांकडे मागील काही दिवसांत एकूण 35 हजार भाडेकरूंची माहिती जमा झालेली आहे.

पोलिसांकडून कडक कारवाईची शक्‍यता

चाकण औद्योगिक परिसरातून बांगलादेशी घुसखोर सागरअली रफिकअली (वय 22 , मूळ रा. शोरूपपूर, पो. कुसुमपूर, ता. महेशपूर, जि. झिजायदा, बांगलादेश) व काश्‍मीरच्या पुलवामा मधील संशयीत दहशतवाद्यांचा साथीदार शरियत अन्वर उलहक मंडल (वय 19, मूळ रा. बाजीपूर, पंचायत गजना, पश्‍चिम बंगाल) अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वी स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेला दहशतवादी चाकण हद्दीत मुंबई एटीएसने पकडला होता. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय मंडळींच्या आडून असामाजिक प्रवृत्तींनी शिरकाव केल्याची भीती व्यक्‍त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)