आपत्कालीन परिस्थितीशी दोन-दोन हात करण्यास तयार
पिंपरी – महापालिका अग्निशामक दलाकडे आपत्कालीन परिस्थितीशी दोन-दोन हात करण्यासाठी आधुनिक साधनसामग्री दाखल झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 4 अंडरवॉटर सर्च कॅमेरा आणि 2 ओबियम बोटींचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी शुक्रवारी दिली.
प्रत्येकी 11 लाख 98 हजार रुपये किंमतीचे हे कॅमेरे आहेत. हा कॅमेरा पाण्याच्या खाली 50 मीटरपर्यंत छायाचित्र काढू शकतो. तसेच, काढलेले छायाचित्र स्क्रीनवर पाठवितो. संबंधित छायाचित्र वायरलेस यंत्रणेद्वारे 20 मीटर अंतरापर्यंत रिमोट व्ह्यूचा वापर करून पाहणे शक्य आहे. त्यामुळे या कॅमेऱ्याचा वापर जर नदीपात्रात होत असेल तर, नदीपात्राजवळ थांबलेल्या अधिकाऱ्यांनाही कॅमेऱ्याद्वारे निघणारे छायाचित्र पाहता येऊ शकते. हाच कॅमेरा एखादी इमारत पडल्यास व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा म्हणून वापरता येणार अहे. त्यामुळे कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली एखादी व्यक्ती अडकली असल्यास तिचा शोध घेणे शक्य होणार आहे.
या कॅमेऱ्याला माईक, स्पीकर यंत्रणा असल्याने कॅमेऱ्याद्वारे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या व्यक्तीशी संवाद देखील साधणे शक्य होणार आहे. 12 मेगापिक्सलचा हा कॅमेरा आहे. पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी या कॅमेऱ्याचा नुकताच वापर करण्यात आला आहे.