विरोधी पक्षांतर्फे वायसीएमच्या अधिष्ठाता यांना निवेदन
पिंपरी – सांधेदुखी आणि ताप आल्यामुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला किडन्या निकामी झाल्याचा चुकीचा अहवाल देत डायलिसिस करण्यास सांगण्यात आले. रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णाच्या जीविताला धोका पोहचण्याची शक्यता होती. या प्रकरणात रुग्णालयातील हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी, विरोधी पक्षातर्फे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी, नगरसेवक दत्ता साने, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, अश्विनी बांगर, राजू भालेराव, रुपेश पटेकर, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, संजय यादव स्नेहल बांगर, अनिता पांजाळ, अनिता नाईक, सुशांत साळवी, सचिन मिरपगार, मिलिंद सोनवणे, विकास कदम, भाग्यश्री चिंचोले, स्वप्निल महागरे आदी उपस्थित होते.
वायसीएम रुग्णालयात सांधेदुखी आणि तापामुळे वेताळनगरमधील रुग्णाला दाखल करण्यात आले. त्यामध्ये, विविध तपासण्या केल्यानंतर अहवालात क्रिटेनिनचे प्रमाण सुमारे 24 असल्याचे दाखविण्यात आले. हे प्रमाण जास्त असल्याने त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तसेच, त्वरित डायलेसिस करण्याची गरज असल्याचे नातेवाईकांना संगितले. त्यानंतर, पुन्हा रक्त तपासणीकरिता पाठविल्यानंतर त्याचा दुसरा अहवाल आला. परंतु, तो अहवाल न पाहताच डॉक्टरानी डायलेसिसचे उपचार सुरु केले होते. याबाबत, नातेवाईकांना शंका आल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर क्रिटेनिनचे प्रमाण सामान्य असून दोन्ही किडन्या उत्तम असल्याचे दाखविले. यामुळे, अहवाल न पाहताच किडनी निकामी असून उपचार सुरु करणे अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.