वाळूमाफियांनी तहसील कार्यालयातून ट्रक पळविला

संग्रहित छायाचित्र.....

माफियांची मुजोरी – पार्किंगचे कुलूप तोडून ट्रक नेला

पिंपरी – तलाठ्याने जप्त केलेला वाळूचा ट्रक आकुर्डी प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंगचे कुलूप तोडून चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रोजी रात्री आठ ते शनिवार (दि.22) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सांगवीच्या महिला तलाठी रुपाली प्रवीणसिंग परिहार (वय-40, रा. क्विन्स गार्डन जनरल वैद्य मार्ग, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रक चालक अरविंद गोपीनाथ खिल्लारे (रा. पुसद कात्खेडा, बुद्रुंक, यवतमाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनअधिकृतपणे वाळू उपसा करुन ती विकण्यासाठी आणलेला हायवा ट्रक (एमएच-16, सी.जी. 5749) हा काही दिवसांपूर्वी तलाठ्यांच्या पथकाने पकडून जप्त केला होता. हा ट्रक आकुर्डी प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालयाच्या कुलूपबंद पार्किंगमध्ये ठेवला होता. शुक्रवारी रात्री आठ ते शनिवार (दि.22) पहाटे साडेतीन या दरम्यान या ट्रकवरील चालक आरोपी अरविंद याने प्राधिकरण येथील तहसील कार्यालयाच्या पार्किंगच्या गेटला लावलेली साखळी तोडून आतमध्ये प्रवेश केला. ट्रकला लावलेली लोखंडी साखळीही तोडून त्याच्याकडील डुप्लीकेट चावीने ट्रक चालू केला. वाळूसोबत हा ट्रक घेवून पसार झाला. निगडी पोलीस चालक व ट्रकचा शोध घेत आहेत.

वाळूमाफियांची दादागीरी

मागील काही दिवसांपासून बेकायदा वाळू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहर तसेच उपनगरात सुरु असलेल्या बांधकामांना अवैधरित्या वाळू पुरवण्याचे काम सुरु आहे. यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याने वाळू माफियांची दादागिरीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तर वाळूमाफियांची जप्त केलेला ट्रक थेट तहसील कार्यालयातूनच पळवून नेण्यापर्यंत मजल गेल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)