पिंपरी-चिंचवड : नगरसेवकांवरील अजित पवारांची नाराजी कायम

-नगरसेवकांना वेळ मिळेना
-विधानसभेला फटका बसण्याची भीती

पिंपरी – लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवार यांचा जिव्हारी लागलेला पराभव अजित पवार हे अद्यापही विसरायला तयार नसल्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांना दूर ठेवणेच पसंद केले आहे. नगरसेवक भेटण्यास गेल्यास त्यांना महत्त्व अथवा वेळही दिला जात नसल्याची चर्चा जोर धरू लागल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्‍यता आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये नगरसेवक व नेत्यांच्या आग्रहामुळे अजित पवार यांनी त्यांचे चिरंजिव पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. प्रचंड पैसे खर्च केल्यानंतरही अत्यंत दारुण पराभवाला पार्थ यांना सामोरे जावे लागले होते. सुरुवातीपासून विजयाची गणिते कागदावर यशस्वी करून दाखविणाऱ्या अनेक नगरसेवकांच्या अतिआत्मविश्‍वासामुळे पराभव झाल्याचा समज पवार यांनी करून घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत विजय होणार असा विश्‍वास देणाऱ्यांनीच घात केल्यामुळे पवार नाराज झाले आहेत.

लोकसभेच्या मतमोजणीला आज एक महिना पूर्ण झाल्यानंतरही पवारांनी पिंपरी-चिंचवडकडे येणे टाळले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नगरसेवकांनाही भेटण्याचे टाळणाऱ्या पवारांनी आता भेटणे सुरू केले असले तरी अवघ्या चार-दोन शब्दांवरच बोळवण करून त्याना माघारी पाठविण्याचा एककल्ली कार्यक्रम चालविला आहे. शनिवारी भेटीसाठी दिवसभर ताटकळणाऱ्या पिंपरीतील नगरसेवकांना अवघा काही मिनिटांचा वेळ देत त्यांच्याकडे पाहण्याचेही टाळल्यामुळे पवारांची नाराजी कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here