भोसरी – पूर्ववैमनस्यातून चौघा जणांनी मिळून कोयता, पेव्हर ब्लॉकने एकास जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना सोमवार (दि.3) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांतीनगर वसाहतीजवळील दत्तमंदिरजवळ भोसरी याठिकाणी घडली.
या घटनेत रवी शंकर जाधव (वय 25, रा. भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, या घटनेतील बाळू दशरथ पवार, अजय चव्हाण, मनोज धुनगव, महेश उपाडे (सर्व रा. शांतीनगर वसाहत, भोसरी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी व आरोपींमध्ये मागील काही दिवसापूर्वी भांडण झाले होते. सोमवारी सांयकाळच्या सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चौघांनी मिळून फिर्यादीस स्टंम्प, पेव्हर ब्लॉक, कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी केले आहे. या घटनेत पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.