शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोमिलन कार्यक्रमात बारणेंच्या विरोधात पत्रकबाजी

आकुर्डी ( दि. 19) – शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोमिलन कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधातील आणि अतिशय खालच्या पातळीवरील मजकूर असलेली पत्रकबाजी झाल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. बारणे समर्थकांनी ही पत्रके गोळा करून फाडून टाकली असली तरी मनोमिलन कार्यक्रमात झालेल्या या प्रकारामुळे दोन्ही पक्षातील दरी अधिकच रुंदावली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. या मतदारसंघाचे श्रीरंग बारणे हे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. होवू घातलेल्या निवडणुकीसाठी आपल्यालाच उमेदवारी मिळणार हे निश्‍चित धरून त्यांनी तयारीही चालविली आहे. मात्र भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी बारणे यांना विरोध दर्शविला आहे. सुरुवातीला वरवरचा वाटणारा हा विरोध आता खालच्या पातळीकडे घसरू लागला आहे. त्याचा प्रत्यय आज आकुर्डीत झालेल्या मनोमिलन मेळाव्यात दिसून आला. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याच्या ठिकाणीच बारणे यांच्या विरोधातील पत्रकबाजी झाली.

बारणे यांनी राष्ट्रवादीचीच तळी उचलली, स्वत:च्या गावात पालिकेसाठी पॅनलही विजयी करण्यात अपयश आले, लोकसभा निवडणुकीत त्यांनी मॅच फिक्‍सींग केली असून विधानसभेसाठी ते राष्ट्रवादीकडून लढणार आहेत यासह बारणे यांच्या शिवराळ भाषेत टीका करणारा मजकूर पत्रकात होता. मनोमिलन कार्यक्रमातच हा प्रकार घडल्याने अचानक खळबळ उडाली.

बारणे समर्थकांनी पत्रके तात्काळ गोळा करून ती फाडून टाकली मात्र या प्रकारामुळे भाजप सेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या वादामागे बारणे – जगताप यांच्यातील राजकीय संघर्ष आहे की, आणखी कोणते कारण याबाबत चर्चा रंगली आहे. या प्रकाराला बारणे कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी : शिवसेना- भाजप मनोमिलन नावापुरतेच?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)