पिंपरी : उपशहर अभियंत्याला सक्‍त ताकीद

पाणीपुरवठ्याबाबत बांधकाम व्यावसायिकांना ना हरकत पत्र

पिंपरी -वरिष्ठांशी कोणतीही चर्चा न करता, चिंचवड विधानसभा मतदार संघातील बांधकाम व्यावसायिकांना पाणी पुरवठ्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची बाब पाणीपुरवठा विभागाचे उपशहर अभियंता रामदास तांबे यांच्या अंगलट आली आहे. याप्रकरणी त्यांना सक्‍त ताकीद देण्यात आली आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड मतदार संघात गृहप्रकल्पांचा सुकाळ आहे. पावसाळा सुरु झाला असताना, पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे. यामुळे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे इत्यादी भागात काही काळ गृहप्रकल्प बांधण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असा प्रस्ताव स्थायी समितीत आयत्यावेळी करण्यात आला होता. त्यावरुन सत्ताधारी भाजपवर विरोधकांनी आरोपांची झोड उठविली होती.

यावरुन शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात चांगलीच जुंपली होती. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. विरोधकांच्या फैरीनंतर झालेल्या स्थायी समितीत या ठरावात बदल करण्यात आला. त्यानुसार यातून पंतप्रधान आवास योजना, म्हाडा, वैयक्‍तिक बांधकामांना वगळण्यात आले आहे. 30 हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना परवानगी दिली होता. 30,0001 चौरस फुटापुढील बांधकामांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद महासभेत देखील उमटले होते.

दरम्यान, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी रामदास तांबे यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसत, कोणत्या गृहप्रकल्पांना ना हरकत प्रमाणपत्र दिले याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. रात्री उशिरापर्यंत कार्यालयातच बसून राहिल्याने आयुक्‍त हर्डीकर यांना या ठिय्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यानंतर तांबे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तर पाणीपुरवठा विभागाच्या सहशहर अभियंता कार्यालयाने दिलेल्या अहवालात पाणी पुरवठा विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्रे कधीपासून देण्याचे बंद केले आणि पुन्हा कधीपासून देणे चालू केले आहे, हे निश्‍चितपणे सांगणे शक्‍य नसल्याचे नमूद केले होते.

दरम्यान, सदस्य प्रस्तावाची अंमलबजावणी करताना धोरणात्मक बाब म्हणून वरिष्ठ प्राधिकारी यांच्याशी सल्लामसलत करुन, आयुक्‍त हर्डीकर यांची विधिवर मान्यता घेणे अपेक्षित होते. मात्र तांबे यांनी हा निर्णय घेताना सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यांचा अभिप्राय लक्षात घेता, त्यांना आयुक्‍त हर्डींकर यांनी सक्‍त ताकीद दिली आहे. याशिवाय भविष्यात कर्तव्य पार पाडताना तत्पतरता आणि सचोटी न आढळल्यास जबर शास्तीची करवाई करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)