शहरातील कचऱ्याचे पाप भाजप नेत्यांच्या खाबुगिरीमुळे -योगेश बहल

खळबळजनक आरोप : ‘स्थायी’त नवे पदाधिकारी येताच ठेकेदाराकडे पुन्हा मागितले पैसे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्ट कारभारामुळेच शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सत्ताधाऱ्यांकडून दोनदा ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची मागणी केल्यामुळेच ठेकेदार न्यायालयात गेला आणि शहरातील कचऱ्याची समस्या ऐरणीवर आली, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर योगेश बहल यांनी केली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बहल बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे उपस्थित होते.

पुढे बोलताना बहल म्हणाले, सत्ताधारी पक्षनेते खोटे आरोप करीत आहेत. सध्या जी कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे, त्याला केवळ सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी जबाबदार आहेत. स्थायी समितीने मुंबईच्या ठेकेदाराला कचरा उचलण्याचा ठेका दिला. मात्र महिनाभरात स्थायी समितीमध्ये नवीन अध्यक्ष व सदस्य आले. नव्या निवडीनंतर याच ठेकेदाराला पुन्हा पैसे मागण्यात आले मात्र ठेकेदाराने नकार दिल्यामुळे वर्कऑर्डर देण्यात आली नाही, असा खळबळजनक आरोपही यावेळी करण्यात आला.

यामुळे चिडलेल्या ठेकेदाराने न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने आदेश देताना महापालिकेवर ताशेरे ओढले. दरम्यानच्या काळात शहरात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला. या संपूर्ण प्रकाराला सत्ताधारी, स्थायी समिती तसेच त्यांचे पक्षनेते एकनाथ पवार जबाबदार असताना केवळ प्रसिद्धीसाठी पवार स्टंटबाजी करून राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत. नव्याने रिंग करून पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. मात्र या सर्व प्रकारात शहरातील जनतेला मात्र त्रास सहन करावा लागला. सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार करून स्वत:चा स्वार्थ साधण्यापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत.

… तर सभागृहात येणार नाही

महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असल्याने पाहिजे त्या पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. सभाशास्त्राचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. एकांगी आणि मनमानी पद्धतीने कारभार करावयाचा असला तर महापौरांनी त्यांच्या सदस्यांना सोबत घेऊन स्वत:च्या घरी सभागृह चालवावे. अशाच पद्धतीने कामकाज चालू ठेवल्यास राष्ट्रवादीचे सदस्य सर्वसाधारण सभेला यापुढे येणार नसल्याचेही बहल यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)