राष्ट्रवादी नगरसेवकांचा सभात्याग, सत्ताधारी मनमानी करत असल्याचा आरोप

पिंपरी चिंचवड महानगरपालिका : विसंगत उपसूचनांमुळे गोंधळ

पिंपरी – स्वच्छ भारत अभियानच्या प्रस्तावाला शहर अभियंता राजन पाटील यांच्या पदोन्नतीची विसंगत उपसूचना दिल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हरकत घेतल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सत्ताधारी भाजप मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत, राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. सभागृह सोडताना सत्ताधारी भाजपचा निषेध केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी)पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषय पत्रिकेवरील स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अवलोकनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपने सह शहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याची उपसूचना दिली. या विषयावर बोलताना माजी महापौर मंगला कदम यांनी विसंगत उपसूचनेला हरकत घेतली. ही रीतसर उपसूचना आहे का? त्याचा खुलासा करण्यात यावा. विसंगत उपसूचनेला आयुक्‍त मंजुरी देणार आहेत का? वाट्टेल तसे सभागृहाचे कामकाज कसे चालविले जाते.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, सभागृह नेते एकनाथ पवार म्हणतात अधिकारी विरोधकांना भेटले नाहीत म्हणून विरोध करत आहेत का? म्हणजेच सत्ताधा-यांना अधिकारी भेटतात. त्यानंतरच बढतीच्या उपसूचना मंजूर करतात का? असा प्रश्‍न उपस्थित केला. सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, आम्ही चांगले काम करत आहोत. विरोधकांना त्याची ऍलर्जी आहे. उपसूचना दिली म्हणजे आम्ही चोऱ्या करत नाहीत. पात्र अधिकाऱ्याला बढती दिली पाहिजे. केवळ अधिकारी भेटला नाही म्हणून विरोध करतात की काय? हे लक्षात येत नाही. विरोधकांच्या देखील आम्ही उपसूचना घेतो. सभागृहात सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. सभागृह सर्वांचे आहे. नगरसेवकांनी आपले प्रश्‍न मांडले पाहिजेत.

महापौर राहुल जाधव यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले. आयुक्‍तांनी शौचालय बांधणीच्या कामाचा खुलासा केला. त्यानंतर महापौर जाधव यांनी विसंगत उपसूचनेबाबत नगरसचिव उल्हास जगताप यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले. अचानक महापौरांनी संकेत डावलत भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना बोलण्यास परवानगी दिली. आयुक्‍तांना उपसूचना सुसंगत वाटली. तर, ते मंजूर करतील. प्रत्येक विषयाचा खुलासा केला जाणे योग्य आहे का? असे सांगत खुलासा न करता विषय मंजूर करण्याची विनंती त्यांनी केला. त्यावर महापौर जाधव यांनी उपसूचनेसह विषय मंजूर केल्याचे जाहीर केले.

त्यामुळे माजी महापौर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, मंगला कदम यांनी बोलू देण्याची मागणी केली. परंतु, महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष करत कामकाज सुरुच ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेत गदारोळ केला. परंतु, भाजपने गदारोळात कामकाज रेटून नेले. त्याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here