पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तक्रार निवारण समिती : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल तक्रारी शून्य

वर्षभरात एकही तक्रार नाही : तक्रार निवारण समितीच्या बैठकीची प्रतीक्षा

पिंपरी – शासनाच्या नियमानुसार बालकांच्या, विद्यार्थ्यांच्या अधिकाराशी संबंधित कोणतीही तक्रार मांडावयाची असल्यास त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तक्रार निवारण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. एक वर्ष उलटूनदेखील या समितीची एकही बैठक झालेली नाही तसेच आमच्याकडे एकही तक्रार न आल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना प्रश्‍नच पडत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या तक्रारी नाहीत की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चे कलम 32 नुसार(1) अन्वये या अधिनियमाखाली कोणत्याही व्यक्तीला एखाद्या बालकांच्या, विद्यार्थ्यांच्या अधिकाराशी संबंधित कोणतेही गाऱ्हाणे अथवा तक्रार मांडावयाची असल्यास त्या व्यक्तीला त्या ठिकाणच्या स्थानिक प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करता येईल अशी तरतूद आहे. त्याला अनुसरुन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील बालकांच्या अधिकाराशी संबंधित कोणतेही गाऱ्हाणे मांडावयाचे असल्यास महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात यासंबंधी तक्रार करता येण्याची सोय आहे. त्यानुसार गेल्या वर्षी महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभाग तक्रार निवारण समिती 21 जुलै 2018 रोजी तयार करण्यात आली होती.

महापालिकेने केलेल्या तक्रार निवारण समितीमध्ये प्रवीण आष्टीकर (अध्यक्ष), पराग मुंढे (सदस्य सचिव), डॉ. कमलादेवी आवटी (सदस्य), सोमा आंबवणे (सदस्य), बाळासाहेब राक्षे (सदस्य), सौदागर शिंदे (सदस्य) यांचा समावेश आहे. शिक्षण घेताना विद्यार्थी बालकांच्या अधिकारासंबंधी अनेक समस्या आणि तक्रारी असताना गेल्या वर्षभरात कोणत्याही विद्यार्थ्याने एकही तक्रार केलेली नाही. तसेच ही तक्रार निवारण समिती अस्तित्वात आहे हे सांगायलाच महापालिका विसरली आहे का असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

समितीत असावा पालकांचा सहभाग

महापालिकेची तक्रार निवारण समिती अस्तित्वात आहे, यासंबंधी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आलेली नाही. यासंबंधी जर समिती कार्यरत असेल तर या समितीने आजवर काय केले आहे याचीही माहिती महापालिकेने द्यावी, अशी मागणी आरटीई पालक संघाचे अध्यक्ष हेमंत मोरे यांनी केली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही विभागांमध्ये अशाप्रकारची तक्रार निवारण समिती असायलाच हवी. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रश्‍न, अधिकारासंबंधी येणाऱ्या अडचणी खुलेपणाने मांडता येतील. तसेच यासंबंधीची माहिती महापालिकेने प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवायला पाहिजे. त्यामुळे शाळेतील पालक, विद्यार्थी यांना माहिती होईल. त्याचबरोबर या समितीमध्ये पालकांचा देखील प्रत्यक्ष सहभाग असेल तर त्या नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

“विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षभरात तक्रार निवारण समितीकडे कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार आलेली नाही.
– सोमा आंबवणे, सदस्य तक्रार निवारण समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)