पिंपरी-चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते पद : मुदतवाढ की नवा चेहरा?

  -लोकसभा मतमोजणीनंतर निर्णय अपेक्षित

– विरोधी पक्षनेते पदामध्ये विधानसभेची गणिते

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एक वर्षाचा कार्यकाल दोनच दिवसांपूर्वी संपुष्टात आल्याने नवा विरोधी पक्षनेता कोण याची चर्चा रंगली आहे. दत्ता साने यांनी केलेले उत्कृष्ट काम पाहून त्यांना अधिकची संधी मिळणार की पक्षातील इतर इच्छुकांपैकी एकाला विरोधी पक्षनेता बनविले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेतून राष्ट्रवादीला हद्दपार करीत भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळविला होता. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद आले होते. पक्षातील जास्तीत जास्त सदस्यांना संधी मिळावी या हेतूने एक वर्षासाठी नगरसेवकांना विरोधी पक्षनेतेपद संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला.

पक्षनेतृत्त्वाचा निर्णय मान्य

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपणाला विरोधी पक्षनेतेपदावर काम करण्याची संधी दिली. या संधी आपण गेल्या वर्षभरात सोने केले. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उजेडात आणण्यात आपल्याला यश आले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट होण्यास मदत झाली. विधानसभा निवडणुका तोंडावर असून आपण भोसरीतून लढण्यासाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक आहोत. पक्षाने विरोधी पक्षनेते पदाची मुदत वाढवून दिल्यास आपण या पदावर काम करून पक्षाची प्रतिमा आणखी उजळ करण्यास कटीबद्ध आहोत. भोसरीतून निवडणूक लढविण्यावरही मी ठाम असून आमचे नेते अजित पवार जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे दत्ता साने यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.

पहिल्या वर्षी ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांना संधी दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी दत्ता साने यांना संधी देण्यात आली. योगेश बहल यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सरस कामगिरी करीत साने यांनी सत्ताधाऱ्यांवर वचक निर्माण करण्यात यश मिळविले. सत्ताधाऱ्यांकडून चालविला जाणारा भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणत भाजपाला जेरीस आणले. त्याचा काही प्रमाणात फायदा लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला झाला आहे.

आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने तसेच पालिकेतील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणारा आणि स्वहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणाराच विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीला द्यावा लागणार आहे. त्यातच दत्ता साने हे भोसरीतून विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांची नाराजी ओढविणे पक्षाला परवडणारे नाही. तर त्यामुळे राष्ट्रवादी दत्ता साने यांना वाढीव कार्यकाल देणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊगर्दी

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभेला विरोधी पक्षनेतपदाची संधी मिळाल्यामुळे आता चिंचवडची दावेदारी या पदावर मानली जात आहे. चिंचवडमधून ज्येष्ठतेच्या निकषावर विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे नाव आघाडीवर आहे. काटे यांच्याशिवाय मोरेश्‍वर भोंडवे यांनीही या पदासाठी दावा केला आहे. या दोघांव्यतिरिक्त माजी उपमहापौर राजू मिसाळ हे देखील स्पर्धेत असून इतर इच्छुकांमध्ये माजी महापौर वैशाली घोडेकर यांनीही दावा केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाला संधी देणार हे देखील पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

विरोधी पक्षनेतेपदातून विधानसभेचे “लॉबिंग’

महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद हा राष्ट्रवादीत येत्या काही दिवसांत कळीचा मुद्दा ठरणार असला तरी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या काहीजणांनी या पदावर दावेदारी केली आहे. विरोधी पक्षनेतेपदातून विधानसभेचे तिकीट आपल्याला मिळावे, यासाठी सुरू असलेली खटाटोप पक्षनेतृत्त्व कशा पद्धतीने घेणार याकडे लक्ष लागले आहे.

“राष्ट्रवादीकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेता हे महत्त्वाचे पद आहे. पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी मिळावी या हेतूने नवा विरोधी पक्षनेता निवडीची पक्ष पातळीवर चर्चा असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही. चांगला चेहरा समोर येईल.
-संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

चिंचवडमधून अपेक्षा उंचावल्या

चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. नाना काटे, मयूर कलाटे, मोरेश्‍वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर या इच्छुकांनी लोकसभेच्या निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाना काटे यांना विरोधीपक्षनेतेपद देवून विधानसभेचा एक इच्छुक कमी करण्याची राष्ट्रवादीची खेळी असू शकते. भोईर हे आपली दावेदारी मागे घेण्याची शक्‍यता असून मयूर कलाटे, मोरेश्‍वर भोंडवे यांच्यात स्पर्धा रंगू शकते. मयूर यांच्यापेक्षा भोंडवे हे ज्येष्ठ असल्याने त्यांचा दावा भक्कम मानला जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते निष्ठावंतांया पाठिशी आपली ताकद लावतात की आयत्यावेळी एखाद्या आयात नेत्यावर चिंचवडची बाजी लावतात याकडे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)