36 जणांचा समावेश : निवडीकडे लक्ष
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध चार विषय समित्यांच्या सदस्यांची निवड येत्या येत्या सोमवारी (दि.20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चार विषय समित्यांच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे. महापौर राहुल जाधव हे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सर्व विषय समित्यांवर भाजप नगरसेवकांची संख्या अधिक असून, भाजपचेच नगरसेवक अध्यक्षपदी आहेत. याशिवाय पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादी व शिवसेना नगरसेवकांची या विषय समित्यांवर निवड होणार आहे. या समित्यांवर राष्ट्रवादीचे दोन तर शिवसेनेच्या एका नगरसेवकाला संधी मिळणार आहे. या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या सदस्यांच्या जागी सर्वसाधारण सभेत नवीन सदस्याची निवड केली जाणार आहे. त्यानुसार नवे सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या एकूण चार समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा व क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचा समावेश आहे. या सर्व समित्यांवर प्रत्येकी नऊ नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. तर महिला व बालकल्याण समितीवर 9 पैकी सात महिला नगरसेवकांचा समावेश असणार आहे.
सदस्य निवडीनंतर होणार सभापती निवड
चार विषय समित्यांच्या नवीन एकूण 36 सदस्यांची निवड 20 तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. त्यानंतर जून महिन्यात या समिती सदस्यांमधूनच सभापतीची निवड होणार आहे. त्यामुळे यापैकी एखाद्या समितीवर वर्णी लागावी, याकरिता नगरसेवकांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. तर स्थायी समिती अध्यक्षपद निवडीत साथ देणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला अध्यक्षपद येणार की नाही? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आचारसंहितेचा अडसर नाही
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 27 मेपर्यंत लागू आहे. या कालावधीत या चारही समिती सदस्यांच्या निवडी होतील की नाही, याबाबत अनेकांना शंका होती. मात्र. आचारसंहितेमध्ये निवड प्रक्रिया राबवू शकत असल्याने या समिती सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वीच प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे.