चर्चा विधानसभेची : राष्ट्रवादीकडून भोसरीत नवा चेहरा?

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठरणार समीकरणे

भोसरी – लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला आणखी आठवडाभराचा अवधी असला तरी पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे राजकीय वारे वाहू लागले आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीच्या लढती होणार हे निश्‍चित असले तरी लोकसभेला एकसंध राहिलेल्या राष्ट्रवादीमध्ये मात्र इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिकीटाची संधी कोणाला यावर आतापासूनच चर्चा झडू लागल्या आहेत. गतवेळी हातचा भोसरी विधानसभा मतदारसंघ गेल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नवा चेहरा दिला जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. एकेकाळी या तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. मात्र सन 2014 साली झालेल्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची वाताहत होऊन सर्वच ठिकाणी विरोधी पक्षाचे उमेदवार विजयी झाले. भोसरीतून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या महेश लांडगे यांनी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले तर पिंपरीतून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार तर चिंचवडमधून भाजपाचेच लक्ष्मण जगताप प्रतिनिधित्त्व करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात विधानसभेच्या उमेदवारीचे गुपित लपले असले तरी आतापासूनच इच्छुकांनी आपले दावेदारी भक्कम करण्यास सुरुवात केली आहे.

भोसरी विधानसभेत भाजपाकडून महेश लांडगे हे उमेदवार असतील हे जवळ-जवळ निश्‍चित झाले आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. माजी आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादीने तीन वेळा संधी दिली. तर सन 2009 साली त्यांना डावलण्यात आले होते. 2004 साली तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्त्व केले होते. 2009 साली मतदारसंघ पुर्नरचनेत भोसरी हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्त्वात आला. विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीने लांडे यांना संधी दिल्याने विधानसभेसाठी त्यांना डावलण्यात आले होते. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित लांडे यांनी विजयश्री खेचून आणली होती. मात्र 2014 साली राष्ट्रवादीने तिकीट दिल्यानंतरही लांडे यांनी अति आत्मविश्‍वास दाखवित विजयाची संधी घालविली.

लोकसभेसाठी पुन्हा राष्ट्रवादीने विलास लांडे यांच्याऐवजी अमोल कोल्हे यांना संधी दिली होती. कोल्हे यांच्या विजयासाठी भोसरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे नेतेमंडळी कधी नव्हे ते एकत्र आले होते. अद्याप निकाल येणे बाकी असले तरी इमाने-इतबारे कोल्हे यांचे काम केल्याने आपणाला संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना निर्माण झाली आहे. त्यातच गेल्या पाच वर्षांत लांडे यांनी स्वत:ला पक्षापासून आणि जनतेच्या कामांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे यावेळी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून दुसराच चेहरा समोर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी यावेळी विधानसभा लढवायचीच असा चंग बांधल्याने लांडे यांच्यापुढील अडचणीत भर पडली आहे. गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही साने यांनी लांडगे यांना ताकद दिली होती.

चिखली, मोरेवस्ती, जाधववाडी, मोशी परिसरातून साने यांना पाठिंबा मिळत असल्याने सध्या त्यांचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहे. दत्ता साने आणि विलास लांडे हे सध्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असले तरी इतरही काही नगरसेवकांनी निवडणुकीत उतरण्याची छुपी तयारी चालविली आहे. लांडे यांना यापूर्वी अनेकवेळा देण्यात आलेली संधी, भविष्यात रिक्‍त होणारी विधानपरिषदेची जागा आणि लांडगे यांच्या विरोधात तगडे आव्हान निर्माण करणारा उमेदवार या बाबींवरच लांडे, साने की आणखी कोण? हे निश्‍चित होणार आहे.

मताधिक्‍य देणाऱ्याला येणार महत्त्व

शिरुर लोकसभा मतदारसंघात भोसरीचा समावेश आहे. या मतदारसंघातून कोल्हे यांना मताधिक्‍य मिळेल, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. मात्र कोणत्या भागातून किती मताधिक्‍य मिळाले आणि कोणी किती प्रामाणिकपणे काम केले यावर बरीच समिकरणे ठरणार आहेत. निवडणुकीनंतर कोल्हे विजयी झाल्यास त्यांच्या शब्दालाही महत्त्व येणार असल्याने लोकसभेच्या मतपेट्या उघडल्या जाताच विधानसभेचा उमेदवारही निश्‍चित होणार, हे उघड गुपित आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)