दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी आखडता हात : मुदत उलटूनही काम अपूर्णावस्थेत
-प्रशांत साळुंखे
चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात येत असलेल्या संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयाचे काम मागील पाच महिन्यांपासून ठप्प झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी देण्यास आखडता हात घेतल्यामुळे नूतनीकरणाच्या कामाला खिळ बसली आहे. कामाची मुदत उलटून सात महिने झाले तरी प्राणिसंग्रहालयाचे काम अपूर्णावस्थेत आहे.
महापालिकेने 1989 मध्ये चिंचवडच्या संभाजीनगर येथे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यान विकसित केले. 1 जानेवारी 1990 रोजी उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले. सर्पकुंडांमुळे सर्पोद्यान असेही या उद्यानाला संबोधले जाते. सुमारे नऊ एकर परिसरातील या उद्यानात चारशे चौरस मीटर हिरवळ, 463 झाडे, 66 सरपटणारे, 12 सस्तन प्राणी व 68 पक्षी, तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी ठेवली होती. विविध प्राणी पाहण्यासाठी दरवर्षी शालेय विद्यार्थी व पर्यटक प्राणिसंग्रहालयाला भेट देत असत. इतर पशू-पक्ष्यांबरोबरच बिबटे पर्यटकांचे आकर्षण बनले होते.
दरम्यान, महापालिकेने प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेतला. त्याचा बृहत् विकास आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करुन केंद्र सरकारच्या प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला. संग्रहालय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी बहिणाबाई उद्यानाची पाहणी केली. त्यांनी निरीक्षणे नोंदवल्यानंतर सस्तन प्राण्यांना येथून हलवण्याचा निर्णय घेतला. हे उद्यान सर्पालय व पक्षालय म्हणून विकसित करण्याची त्यांनी परवानगी दिली. बिबटे, माकड आदी प्राणी अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले.
बृहत् विकास आराखड्यानुसार संग्रहालयाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात स्थापत्यविषयीच्या कामांचा समावेश होता. या कामांमध्ये प्राणिसंग्रहालयासाठी प्रशासकीय इमारत, स्टोअरेज रूम आणि स्टाफ क्वॉर्टर, पक्ष्यांसाठी स्वतंत्र कक्ष, मगर आणि सुसर कक्ष, सर्पालय, अंतर्गत पादचारी मार्ग, स्वच्छतागृह ही कामे हाती घेण्यात आली.
पहिल्या टप्पातील कामे डिसेंबर 2017 मध्ये पूर्ण झाली. मात्र, पुढील टप्प्यातील कामांचा निधी पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिला गेलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील काम रखडले आहे. मागील पाच महिन्यांपासून काम पुर्ण ठप्प झाले आहे. महापालिकेने निधी उपलब्ध करुन देत लवकरात लवकर प्राणिसंग्रहालय खुले करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
“स्थायी समितीकडून लवकरच निधी मंजूर करुन घेतला जाईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निविदेस मान्यता मिळताच काम युद्धपातळीवर सुरू होईल.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
संग्रहालयासाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा
नियोजनानुसार दुसऱ्या टप्प्याचे काम ऑक्टोबर 2018 ला पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निधीअभावी दुसरा टप्पा रेंगाळला आहे. या टप्प्यातील कामांचा खर्च 5 कोटी 82 लाख इतका आहे. त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
सर्पोद्यान व पक्षालय यामध्ये साकारण्यात येणार आहे. तेथे प्राण्यांच्या सुरक्षेसाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील सुविधांचा अभ्यास करून त्यानुसार नूतनीकरण करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर निधीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या हलचाली सुरू आहेत. महापालिकेच्या संथगती कारभारामुळे प्राणिसंग्रहालयाचे काम आणखी वर्षभर लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.