पिंपरी-चिंचवड : पालेभाज्यांच्या किंमती तिपट्टीने वाढल्या

मॉन्सून लांबल्याचा परिणाम : आवक मोठ्या प्रमाणात घटली

पिंपरी – मागच्या काही दिवसांपासून फळभाज्यांच्या किंमतीमध्ये वाढ होत असतानाच आता पालेभाज्यांच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवड्‌यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यात लांबणीवर पडलेला मान्सून यामुळे आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याचा दरावर परिणाम झालेला पहायला मिळत आहे.

वातावरणातील बदल, राज्यात ठिकठिकाणी झालेला अवकाळी पाऊस आणि कमी असलेली लागवड यामुळे अगोदरच पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याने परिणामी पालेभाज्यांच्या भावात पूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरात घाऊक बाजारात पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणांहून भाजीपाल्याची आवक होते. मात्र पालेभाज्यांची आवक मुख्यत्वे नाशिक व पुण्याहून होते. परंतु, मागच्या काही दिवसापासून पुण्यातच पालेभाज्याची आवक मंदावली आहे. परिणामी शहरात पुण्याहून येणाऱ्या पालेभाज्याचे प्रमाण कमी झाले आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात अत्यल्प पालेभाज्यांचा पुरवठा होत आहे. सध्या मोशी येथील उपबाजार समितीमध्ये कोथींबीर जुडी 19 रुपये, मेथी 17 रुपये, शेपू 9 रुपये, कांदा पातीचा भाव 13 रुपये, पालक 6 रुपये, मुळा 9 रुपये, जुडीवर पोहचला आहे. घाऊक बाजारात हे दर असले तरी किरकोळ बाजारात हा माल जाईपर्यंत त्याचे दर तिप्पट होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाजीमंडईमधून कोथिंबीर 40 ते 50 रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. तर मेथी 30 ते 40 रुपये जुडी प्रमाणे खरेदी करावी लागत आहे. तर कांदा पात, मुळा आणि शेपूची जुडी 20 ते 30 रुपयांना विकली जात आहे.

साडेचार हजार गड्ड्यांची आवक घटली

मोशी येथील उपबाजारसमितीमध्ये मागच्या आठवड्याचा विचार केला तर 16 जून रोजी 17 हजार 450 पालेभाज्यांच्या गड्ड्यांची आवक झाली होती. तर, रविवारी (दि. 23) यामध्ये 4 हजार 500 गड्ड्यांची आवक कमी होवून केवळ 12 हजार 930 गड्ड्यांचीच आवक झाली आहे. सध्या होत असलेली आवक सरासरीच्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस घाऊक बाजाराबरोबरच किरकोळ बाजारातही मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे भाव वाढणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here