अबाऊट टर्न: फोबिया

हिमांशू

“कुणीतरी आहे तिथं’ असे सतत वाटत राहणे, सतत आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याची शंका येणे आणि त्यातून निर्माण झालेला भयगंड माणसाला कुरतडून टाकतो. तसे पाहायला गेले, तर भयगंड म्हणजे फोबिया अनेक प्रकारचे असतात. कुणाला खूप उंचावरून खाली पाहण्याची भीती वाटते. आपण खाली पडणार असे वाटते तर कुणाला अथांग पाणी पाहिले की वाटते, हा जलाशय आपल्याला गिळून टाकणार. मानवी उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांत परिस्थितीनुसार वेगवेगळे फोबिया निर्माण झाले असतील.

फोबियावर मानसतज्ज्ञांची ट्रीटमेंट घेण्याइतकी जागरूकता पूर्वी समाजात नव्हती. त्यामुळे फोबियाचे अनेक प्रकार आपल्याला माहीतसुद्धा नसतील. एवढे मात्र खरे की प्रगतीच्या एकेक पायऱ्या जसजसे आपण चढत गेलो, तीव्र स्पर्धेचा बागुलबुवा आपल्या डोक्‍यात शिरला, जगणे अधिकाधिक असुरक्षित होत गेले, नाती अधिकाधिक दुरावत गेली आणि भविष्याची चिंता वाढत गेली, तसतसे नवनवीन फोबिया जन्माला आले.

मानसोपचारतज्ज्ञ व्यक्‍तीच्या पार्श्‍वभूमीचा अभ्यास करून त्यावर उपचार करू लागले. हे सगळे मनाचे खेळ. दृष्टीआडच्या सृष्टीचा बागुलबुवा! “कुणीतरी आहे तिथं’ असे वाटले तरी प्रत्यक्षात कुणीतरी तिथे असतेच असे नाही. परंतु वाढत्या अस्थिरतेबरोबर फोबिया वाढतात, हे गृहीत धरले तर भविष्यात ज्या मोठ्या फोबियाची धास्ती वाटते, तो म्हणजे “तंत्रफोबिया’! सतत ऑनलाइन राहणाऱ्यांना हा फोबिया विळखा घालू शकतो.

ऑनलाइन सृष्टी नेहमीच दृष्टिआड असते. त्यामुळे या फोबियाला सुरुवातही झाली असण्याची शक्‍यता आहे. परंतु आपल्या मनात नेमके काय घडतेय, हे संबंधितांना अजून समजू लागलेले नसावे. सतत ऑनलाइन राहणाऱ्यांना “व्यसनमुक्‍त’ करण्याचे प्रयत्न सुरू झालेत; पण दुष्परिणामांची सार्वजनिक चर्चा अद्याप मर्यादित आहे. कल्पना करा, एखाद्या ओळखीच्या व्यक्‍तीने आपल्याला ई-मेल पाठवला. एक अडचण सांगितली आणि पैसे मागितले. आपण त्या व्यक्‍तीला ऑनलाइन पैसे पाठवले. काही दिवसांनी आपल्याला समजले की, त्या व्यक्‍तीने पैसे मागितलेच नव्हते.

दुसरेच कुणीतरी पैसे घेऊन पसार झाले… काय वाटेल आपल्याला? ही काही दंतकथा नव्हे. हे घडू लागलंय. सर्वसामान्यांचे सोडा; या देशाचे माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांना याचा प्रत्यय आलाय. नेहमी ई-मेलवरून त्यांच्या संपर्कात राहणारे त्यांचे न्यायाधीश मित्र बी. पी. सिंग यांनी त्यांच्या पुतण्याचे ऑपरेशन असल्याचा मेल धाडला. उपचारांसाठी मोठा खर्च असल्याचे सांगून सर्जनचा खाते क्रमांक दिला. न्या. लोढा यांनी त्या खात्यात एक लाख रुपये पाठवले. परंतु आपला ई-मेल हॅक झाल्याची माहिती न्या. बी. पी. सिंग यांनीच लोढा यांना दिली. आपल्या ई-मेलवरून आपल्या नावावर कुणी कुणाला पैसे मागितले तर?

तंत्रज्ञान प्रचंड वेगाने विस्तारतेय, याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा आणि आहेही! परंतु ज्या वेगाने सुविधा वाढताहेत, त्या वेगाने सुरक्षितता वाढत नाही, हे कटू सत्यही स्वीकारायला हवे. सायबर विश्‍वात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी सक्षम कायदेही आपण करू शकलेलो नाही. तंत्रज्ञानाच्या विस्ताराचा वेग कितीही असला, तरी गुन्हेगार त्याच्याही दोन पावले पुढे आहेत. ई-मेल हॅक होणे हा भीतीचा एक नमुना. असे अनेक भयगंड आपल्या प्रतीक्षेत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)