पेट्रोल, डिझेल 2.50 रुपयांनी स्वस्त 

सर्वसामान्यांना अंशतः दिलासा 
उत्पादन शुल्कात 1.50 रुपया कपात 
राज्यांचे कर 1.50 रुपयांनी कमी करण्याची केंद्राची सूचना 
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अंशतः कपात करून केंद्र सरकारने नागरिकांना थोडासा दिलासा दिला. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये लीटरमागे 1.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तसेच तेल कंपन्यांनी लीटरमागे 1 रुपयाची कपात करावी अशी सूचनाही सरकारने केली आणि या इंधनाचे दर प्रति लीटर 2.50 रुपयांनी कमी केले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थानिक कर किंवा मूल्यवर्धित करही कमी केल्यास पेट्रोल, डिझेलच्या किंमती 5 रुपयांनी कमी होतील. ही दर कपात आज (गुरुवारी) मध्यरात्रीपासून लागू केली जाणार आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’ सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क दुसऱ्यांदाच कमी करण्यात आले आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे सरकारचा महसूलामध्ये 10,500 कोटी रुपयांची घट होणार आहे. मात्र सातत्याने वाढत जाणाऱ्या आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचलेल्या इंधनाच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची घोषणा केली. राज्य सरकारांनीही याच प्रमाणे स्थानिक कर किंवा व्हॅटमध्ये कपात करावी, अशी सूचनाही जेटली यांनी केली आहे. केंद्रीय तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अन्य मंत्र्यांबरोबर जेटली यांनी बुधवारी आणि गुरुवारी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जेटली यांनी सांगितले. क्रूड तेलाच्या किंमती वाढल्याने राज्यांच्या महसूलामध्ये वाढ झाली आहे. त्यमुळे राज्यांना 2.50 रुपये दरकपात करणे शक्‍य होईल, असेही जेटली म्हणाले.
गेल्यावर्षी जूनपासून इंधनाच्या किंमती जवळपास दररोजच बदलल्या जात आहेत. ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे 6.86 रुपये आणि डिझेलच्या किंमतीतल लीटरमागे 6.73 रुपयांची वाढ झाली आहे.
जागतिक पातळीवरील इंधनाच्या किंमती घसरल्या असताना भाजप सरकारने नोव्हेंबर 2014 आणि जानेवारी 2016 दरम्यान 9 वेळा टप्प्याटप्प्याने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लीटरमागे 11.77 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क लीटरमागे 13.47 रुपयांनी वाढवले आहे. मात्र केवळ गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये लीटरमागे 2 रुपयांनी इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. मे महिन्यात इंधनाच्या किंमती पहिल्यांदा सर्वाधिक वाढल्या होत्या. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून इंधनाच्या किंमती पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली होती. तेंव्हापासून इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्यच्या मागणीला सरकारने वारंवार विरोध केला होता.
भाजप शासित राज्यांमध्ये 5 रुपयांची दरकपात 
केंद्राच्या सूचनेनुसार महाराष्ट्र आणि गुजरातने सर्वप्रथम”व्हॅट’मध्ये 2.50 रुपयांची कपात केली आहे. त्याशिवाय छत्तीसगड, झारखंड, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि आसाम या भाजपशासित अन्य राज्यांमध्येही अशाचप्रकारची घोषणा लगेच झाली आहे. त्यामुळे भाजपशासित 10 राज्यांमधील इंधनाच्या दरात सरसकट 5 रुपयांची दरकपात होणार आहे. गेल्या महिन्यात राजस्थान, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशनेही “व्हॅट’मध्ये कपात केली होती. अन्य महानगरे आणि राजधानीच्या शहरांच्या तुलनेत दिल्लीत इंधनाच्या किंमती सर्वात कमी आहेत. दिल्लीत पेट्रोल 84 रुपये आणि डिझेल 75 रुपये लीटर दराने विकले जाते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)