“पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात हायकोर्टात याचिका

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूक आचार संहितेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखा, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. आरपीआय(आय)चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या वतीने ऍड. गुप्ता यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने केंद्रीय निवडणूक आयोगासह सर्व प्रतिवादींना म्हणणे मांडण्याचे निर्देश देत याचिकेची तातडीने सोमवार, दि. 1 एप्रिलाला सुनावणी निश्‍चित केली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला “पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट 5 एप्रिल रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. आगामी लोकसभा निवडणुक आचार संहिता लागू करण्यात आल्याने या निवडणुका पारदर्शकरित्या पार पडण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी विनंती याचिकेत केली आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश देताना प्रतिवादींना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)