पेठची महिला १२ वर्षांनी झाली जटामुक्त

मंचर  – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पेठ (ता. आंबेगाव) येथील एका महिलेला 12 वर्षांच्या साडेतीन फुट लांबीच्या केसांच्या जटातून मुक्त करून त्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्त्यांनी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून जट काढण्यात यश मिळविले.

पुष्पा पवळे यांच्या अंगात येत असल्यामुळे सौदत्ती (कर्नाटक) येथील देवीला जाण्याचा सल्ला त्यांना काही भोंदुबाबांनी दिला होता. तसेच तेथे जट आपोआप गळुन पडेल असे सांगितले. अंधश्रद्धेच्या या भोळ्या आशेपुढे त्या सौदत्तीला गेल्या, परंतु त्यांची जट काही सुटली नाही. तर ती जट वाढतच गेली. त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक आजार वाढतच गेला. पवळे यांना समुपदेशनाची गरज आहे. तुम्ही त्यांच्या घरी येऊन त्यांना समजावून सांगण्याची विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांना केली.

जाधव ह्या गेल्या आठ महिन्यांपासून पवळे यांच्या कुटुंबीयांबरोबर फोनवर संपर्क करीत होत्या. पेठ येथे येऊन पवळे यांची जट काढण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ठरविले. चाकणचे अंनिसचे कार्यकर्ते मनोहर शेवकरी, राजगुरुनगरच्या ऍड. साधना बाजारे यांच्यासह पेठ येथे पवळे यांच्या घरी शुक्रवारी (दि. 5) गेले. यावेळी पवळे आणि तसेच त्यांच्या कुटुंबीतील सुभाष पवळे, सत्यवान गोपाळे, धोंडीबा पवळे तसेच त्यांच्या घरातील सर्व महिलांचे देखील समुपदेशन करण्यात आले.

पवळे कुटुंबीयांना अंधश्रद्धेबाबत असणाऱ्या शंकाचे निरसन करुन पुष्पा पवळे यांची साडेतीन फुट लांबीची केसांची जट काढण्यात आली. जटामधील केसांचे वजन दोन किलो भरले आहे. केसांची व्यवस्थित निगा राखली नाही किंवा केस विंचरले नाही तसेच अस्वच्छतेमुळे केसांचा गुंता होतो. तो वाढत जातो. त्याला जट म्हणतात. अस्वच्छतेमुळे केसांमध्ये गाठ तयार होते. त्याला देवीची गाठ म्हणून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे अंधश्रद्धेला वाव मिळतो. समितीने 115व्या महिलेला जटमुक्त करण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)