#व्यक्तिमत्व : मनाचे हॉटस्पॉट ऑन करा

सागर ननावरे 

काही दिवसांपूर्वी आम्ही सर्व मित्र बऱ्याच महिन्यांनी एकत्र भेटलो. एकमेकांच्या कार्यक्षेत्राबद्दल एकमेकांना माहिती व्हावी आणि त्यातून प्रत्येकाच्या कल्पनांचा एकमेकांना फायदा घेता यावा हा त्यामागचा उद्देश होता. सुरुवातीला एकमेकांची खुशाली आणि विचारपूस झाली. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कार्यक्षेत्राबद्दल आणि अनुभवांबद्दल बोलू लागला. मी सुद्धा व्यक्तिमत्त्व प्रशिक्षण क्षेत्रातील संधी आणि त्याचे फायदे शेअर केले. त्यानंतर अल्पोपाहारासाठी वेगवेगळ्या टेबलवर बसल्यावरसुद्धा शेअरिंग सुरूच होते. आमचा सतीश नावाचा एक मित्र एका नामांकित कंपनीसाठी डिजिटल मार्केटिंगचे काम करीत होता.

 

आम्ही तिघे चौघेजण अल्पोपहाराचा आनंद घेत गप्पा मारत होतो. आम्ही सतीशला डिजिटल मार्केटिंग पद्धतीबद्दल विचारू लागलो; परंतु तो आमच्या प्रश्‍नांची अपेक्षित उत्तरे देत नव्हता. काहीतरी मागे ठेवून वरवरची किरकोळ माहिती आम्हाला सांगत होता. ही गोष्ट आमच्या सर्वांच्या लक्षात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तरीसुद्धा आमच्यातील एकाने न राहवून त्याला विचारले, मला पण डिजिटल मार्केटिंगच्या काही टिप्स देशील का?
यावर मोठ्या आवेशाने त्याने उत्तर दिले-अरे, ते तेवढे सहज शक्‍य नाही. त्यासाठी खूप वेळ लागतो. आणि बौद्धिक क्षमता सुद्धा खूप खर्ची कारावी लागते.

आम्ही सारे मित्र एकमेकांकडे पाहून गालातच हसलो. कारण त्याची लपवून ठेवण्याची कुप्रवृत्ती आमच्या लक्षात आली होती. पुढे काही वेळ गप्पांत निघून गेला. तो मोबाईलवर काहीतरी करत बसला होता. अचानक तो निराशेने बोलला, छे यार या नेटला सुद्धा आताच संपायचं होतं.

त्याच्या मोबाईलचे नेट संपले आहे हे एव्हाना आमच्या लक्षात आले होते. अशावेळी आमच्यातील एक हजरजबाबी मित्र त्याला उद्देशून बोलला, अरे सतीश माझ्या मोबाईलमध्ये भरपूर डेटा आहे मी हॉटस्पॉट ऑन करून डेटा शेअर करू का?

त्यावर आनंदाने तत्काळ तो बोलला, हो यार, प्लीज कर ना. खूप बरे होईल,
त्याच्या या उत्तराला अपेक्षित धरून तो मित्र सतीशला म्हणाला, चालेल, पण माझी एक अट आहे?
सतीश बोलला, अट, कसली अट?

तो बोलला, तुलासुद्धा तुझ्या मनाचे हॉटस्पॉट ऑन करावे लागेल,
त्यावर सतीश गोंधळला आणि म्हणाला म्हणजे तुला नक्की काय म्हणायचे आहे?
तो मित्र म्हणाला, सतीश, तू मला तुझ्याकडे असणारे डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान शेअर करताना विचार केलास. पण मित्रा, ज्ञान वाटल्याने वाढते साठल्याने नाही.

सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. सतीश मात्र सर्व मित्रांत पुरता खजील झाला होता. आपली चूक त्याच्या लक्षात आली होती. असे म्हणतात की, आनंद वाटल्याने वाढतो आणि दु:ख विभागल्याने घटते. मला यापुढे जाऊन आवर्जून म्हणावेसे वाटते की ज्ञान वाटल्याने वाढते आणि साठल्याने ते संकुचित होते. आजही आपल्या समाजात अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आहेत, ज्यांनी आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा व्हावा यासाठी ते आनंदाने वाटले आणि त्यामुळेच ते आज जनमानसात आणि समाजात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपास आले आहेत; परंतु दुसरीकडे ज्ञान आपल्या मनाच्या पिंजऱ्यात बांधून ठेवून त्याची सर्कस करणारे संकुचित विचारसरणीचे विदूषकही आहेत.

जे या ज्ञानाचा मोठेपणा लोकांना दाखवून केवळ स्वतःचा स्वार्थ पाहतात. थ्री इडियटस्‌ नावाच्या प्रसिध्द सिनेमात हा विषय अतिशय सुंदररीत्या मांडला आहे. या चित्रपटातील नायक हा सतत इतरांना प्रोत्साहन देतो. आपल्याकडील ज्ञान किंवा चंगल्या गोष्टी इतरांत वाटतो आणि तो एक यशस्वी संशोधक बनतो. तर दुसरीकडे चतुर नावाची एक व्यक्ती मात्र स्वतःचे ज्ञान वाटण्यापेक्षा स्वतःसाठी वापरण्यातच धन्यता मानते. अगदी इतरांना वेगळ्या मार्गाला लावून स्वतः गुपचूप अभ्यास करून परीक्षेत यश मिळवते; परंतु त्यानंतर त्याचे काय होते हे त्या चित्रपटात आपण सर्वांनी पहिलेच आहे. आपण ज्ञान वाटायला शिकले पाहिजे. आपल्याकडे साधुसंतानी सांगितले आहे की, “जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करून सोडावे। सकळ जन।।

यातून बोध घेऊन आपले ज्ञान आणि अनुभव इतरांशी शेअर करायला शिकले पाहिजे. केवळ मोबाईलचा हॉटस्पॉट ऑन करून व आपल्यातील दानशूरपणा दाखवून काहीही होणार नाही. आपल्या मनाचे हॉटस्पॉटसुद्धा ऑन करून ज्ञानाची देवाण घेवाण आपल्याला करता आली पाहिजे. तसेच ते वाटताना केवळ मोठेपणा, शहाणपणा किंवा फुकटचा सल्ला म्हणून देण्याची भावना नको. आपल्या शेअरिंग ने इतरांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडेल असा मानस असायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)