व्यक्‍तिमत्त्व : माफ करा, मन साफ करा

सागर ननावरे 

परवा मोटारसायकलवरून जाताना पराग नावाचा मित्र भेटला. निस्तेज चेहरा, वाढलेली दाढी, कपाळावर चिंतेच्या आठ्या,अस्ताव्यस्त वाढलेले पोट आणि मरगळलेली शरीरयष्टी. सुरुवातीला त्याला पाहून मी ओळखलेच नाही. परंतु त्याने मला ओळखले आणि गाडी रस्त्याच्या कडेला लावून माझी विचारपूस करू लागला. मला विश्‍वासच बसत नव्हता की हाच का तो स्मार्ट पराग. एकेकाळी नेहमी प्रसन्न मुद्रेने आणि प्रभावी संवादाने लोकांना आपलेसे करणारा. परंतु ऐन तारुण्याच्या काळात जणू वयाला उतरणीची कळा लागलेला. काहीसा तणावग्रस्त आणि निराशेच्या भोवऱ्यात पुरता अडकलेला.
मी त्याची ही अवस्था पाहून त्याला विचारणा केली. सुरुवातीला काहीतरी विनोद करून त्याने टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्याने मनात दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तो मला सांगू लागला,अरे महिनाभरापूर्वी बायको रागाने माहेरी निघून गेली आहे. मी त्याला विचारले,असे काय झाले की वहिनींनी तडक माहेर गाठले? तो सांगू लागला,आमच्या दोघांमध्ये एकदा शुल्लक कारणावरून वाद झाले.रागाच्या भरात तिने मला एकेरी संबोधले. त्यामुळे मी तिच्यावर हात उचलला. आणि ती रागाने माहेरी निघून गेली. घरच्यांनी मध्यस्थी केली परंतु ती मी माफी मागावी म्हणून अडून बसली आहे. आणि तुला तर माहीतच आहे आपल्याकडे चुकीला माफी नसते. मी परागला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही फायदा होईल असे वाटत नव्हते. केवळ स्वतःत पराकोटीचा अहंभाव निर्माण झाल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली होती. या प्रकरणात नक्की चूक कोणाची होती? रागात एकेरीवर जाणाऱ्या परागच्या बायकोची? स्वाभिमानाला(अहंभावाला) ठेच लागल्याने बायकोवर हात उचलणाऱ्या परागची? की मध्यस्थी करण्यात अपयशी ठरलेल्या घरच्यांची?

मुळात यात चूक होती ती दोघांत निर्माण झालेल्या अहंकाराच्या भावनेची. मीपणा,अहंकार जेव्हा मर्यादेची पातळी ओलांडतो तेव्हा तो माणसाला रसातळाला नेतो. राग ही प्रतिकूल परिस्थितीत नियंत्रण न मिळवता येणारी गोष्ट आहे. रागाच्या भरात तिने एकेरीत संबोधन केले किंवा त्याने तिच्यावर हात उचलला तात्पुरत्या घडलेल्या गोष्टी होत्या. परंतु त्या गोष्टींचे गाठोडे मनाच्या कप्प्यात घट्ट बांधून ठेवल्याने त्यांच्यावर ही वेळ आली होती. यावर अतिशय सोपा आणि रामबाण असा मंत्र होता. जो उच्चारला असता तर कदाचित एवढा प्रसंग घडला नसता. आणि तो मंत्र म्हणजे माफ कर आणि झाले गेले विसरून जाऊन तुझे मन साफ कर. अनेकदा कुठल्याशा किरकोळ कारणावरून व्यक्तीव्यक्तीत मतभेद होतात. आणि या मतभेदाला अहंकाराची जोड मिळाल्यास मनभेद होतात आणि ते एकमेकांपासून दुरावतात.

अहंभावाच्या मानसिकतेची हळूहळू अढीवर अढी बसत जाते. आणि मनामनातील दरी मात्र अधिकच खोलवर घेऊन जाते. हे सारे घडण्याचे एकमेव कारण म्हणजे कोणीही नमते न घेणे. झालं गेलं विसरून जाऊन दुसऱ्याला माफ करायला तयार नसणे. आपल्याला इतरांना माफ करता आले पाहिजे. स्वतःतील चुका जाणून घेऊन माफी मागण्याची व माफ करण्याची वृत्ती जोपासता आली पाहिजे. क्षमा हा मानवाचा आंतरिक गुण आहे. हा गुण आपल्याला आपल्या आचरणातून दर्शविता आला पाहिजे. एखादी गोष्ट वेळीच सोडून देता आली पाहिजे. झाले गेले विसरून,क्षमा मागून नात्याचे तुटलेले धागे पुन्हा विणता आले पाहिजेत.

“भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर’

अगदी या गीतात सांगितल्याप्रमाणे. एखाद्याविषयी आपल्या मनात हिंसेची किंवा द्वेषाची भावना निर्माण झाल्यास मानसिक तणाव वाढतो. एकमेकांबद्दल कुविचारांनी मनाची मलिनता अधिकच गडद होत जाते. अनेकदा यातून हिंसक वृत्तीला चालना मिळण्याची शक्‍यता असते. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या विचाराने सूडाग्नी पेट घेतो. परिणामी मानसिक संतुलन बिघडून त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होतो. आणि म्हणूनच हे नष्ट करण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे मोकळ्या मनाने माफी मागणे. क्षमा केल्याने किंवा माफी मागितल्याने आपल्या संयमी व्यक्तिमत्त्वाचे व शांत स्वभावाचं दर्शन होत असत. अंतकरणातून किंतु-परंतु ची भावना नष्ट झाल्यामुळे मन निर्मळ व हलके होते. परंतु आपण एखाद्याला माफ करताना किंवा माफी मागताना उपकाराची भावना मनात यायला नको. जे काही करायचे ते स्पष्ट आणि निर्मळ भावनेने. कारण क्षमा करण्यात जी ताकद आहे ती क्रोधात आणि अहंकारात कणभरही नाही. कुणीतरी फार छान सांगितले आहे,

टिपावं तर अचूक टिपावं,
नेम तर सारेच धरतात.।।
शिकावं तर माफ करायला,
राग तर सगळेच करतात ।।

चला तर मग झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे म्हणत माफ करायला आणि माफी मागायला शिकूया. “एकमेकांना मनमोकळेपानाने माफ करा आणि दूषित मने साफ करा” बस्स एवढेच लक्षात ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)