‘लाव रे तो व्हिडिओ’ आता मुंबईत; राज ठाकरेंच्या सभेला मिळाली परवानगी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतील पहिल्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे, मात्र ही सभा 24 एप्रिल ऐवजी 23 एप्रिलला होणार असून शिवडीतील काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावर ही सभा होणार आहे. त्यामुळे राज यांच्या मुंबईतील सभेची उत्सुकता वाढली असून ते यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात नांदेड, सोलापूर, सातारा ,इचलकरंजी आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यानंतर पाचवी सभा आज रायगड येथे पार पडली. राज यांनी या पूर्वीच्या आपल्या चारही सभांमध्ये शिवसेनेवर टीका केली नव्हती, पण रायगडमध्ये त्यांनी काही प्रमाणात शिवसेनेवर टीका केली. त्यामुळे येथून पुढे मुंबईतील सभेत राज ठाकरे हे शिवसेनेवर हल्लाबोल करतील अशी चर्चा सर्वत्र आहे.

दरम्यान, राज यांच्या मुंबईतील सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली होती. मुंबईतील या सभेवरून पालिका आणि निवडणूक अधिकारी यांच्याकडून देखील टोलवाटोलवी केली जात होती. निवडणूक सभांना परवानगी देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेअंतर्गत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी मनसे निवडणूक लढवत नसल्याचेही कारण देण्यात आले होते. पण, निवडणूक आयोगानं परवानगी दिली नाही तरी आम्ही सभा घेणार अशी आक्रमक भूमिका मनसेनं घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात रणशिंग राज यांनी रणशिंग फुकले आहे. आपल्या प्रत्येक भाषणातून मोदी-शहांविरुद्ध जोरदार फटकेबाजी करताना राज ठाकरे हे दिसत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह नावाचं देशावर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून मी प्रचार करतोय, असं त्यांनी सांगितल आहे. राज ठाकरे यांच्या सभांना महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे तसेच या सभाची देशभर चर्चा होत असून इतर राज्यातही सभा व्हावी अशी मागणी होत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)