शाश्‍वत हवाई वाहतुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम आवश्‍यक

हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत : “टॉप टेन’ विमानतळे “कार्बन न्युट्रल’ असावीत

पुणे – “देशातील हवाई वाहतूक वाढविण्यासाठी सध्याच्या विविध योजनांना चांगले यश मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून देशांतर्गत हवाई वाहतुकीत तब्बल 29 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. एकीकडे हवाई वाहतूक वाढत असताना, त्यासोबत होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांबाबतही जागरूक असणे आवश्‍यक आहे. हवाई वाहतुकीचा वाईट परिणाम टाळण्यासाठी देशभरातील “टॉप टेन’ विमानतळे “कार्बन न्युट्रल’ अर्थात कार्बनचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होईल, यासाठी कालावधी निश्‍चित करण्याची आवश्‍यकता हवाई वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशातील हवाई वाहतूक वाढविण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासाठी “उडान’सारखी योजनादेखील लागू करण्यात आली आहे. मात्र, हवाई वाहतुकीमुळे होणारे पर्यावरणीय परिणाम देखील गंभीर आहेत. देशाच्या हवाई वाहतूक अहवालानुसार, “कार्बन उत्सर्जन वाढविण्यात प्रमुख भूमिका असलेल्या घटकांमध्ये हवाई वाहतुकीचा समावेश असून, त्याचे 2 टक्के प्रमाण आहे. इतकेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात विमान वाहतूक ही जीवाश्‍म इंधनावर (फॉसिल फ्युएल) अवलंबून आहे. यामुळे कार्बन डायऑक्‍साइड सारख्या ग्रीनहाऊस गॅसेसची निर्मिती होते. याव्यतिरिक्त विमानांद्वारे होणारे ध्वनी प्रदूषण ही देखील एक गंभीर समस्या आहे.

याबाबत हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वांडेकर म्हणाले, “हवाई वाहतुकीमुळे होणारे पर्यावरणीय समस्या ही देखील चिंतेचा विषय आहे. हे पर्यावरणीय नुकसान टाळण्यसाठी आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना म्हणजेच इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेझन यांनी काही उद्दिष्टे ठरवून दिली आहे. यानुसार विमान वाहतुकीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन रोखणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच 2020 सालापर्यंत विमानतळांनी “कार्बन न्युट्रल ग्रोथ’ करणे आवश्‍यक असल्यचे सांगितले आहे. भारतीय नागरी हवाई वाहतुकीचा विचार करता, शाश्‍वत विकासासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यांची गती अपेक्षित प्रमाणात नाही. त्यामुळेच पर्यावरणपूरक विमान वाहतुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणे अत्यावश्‍यक आहे.’

दिल्ली, कोची विमानतळ पर्यावरणपूरकतेकडे
देशातील दिल्ली हे एकमेव विमानतळ आहे, ज्याला “कार्बन न्युट्रल’ विमानतळ म्हणून दर्जा प्राप्त आहे. तर सौर ऊर्जा, पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठीच्या उपाययोजना या सर्व बाबींचा समावेश असलेला कोची विमानतळ हा देशातील “हरित विमानतळाचा’ दर्जा मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)