लोकसहभागातून खळाळणार “खेमावती’

प्रशांत ढावरे
लोणंद – खेमावती स्वच्छता अभियान समिती व लोणंदकरांच्या सहभातून खेमावती नदीची स्वच्छता केल्यानंतर गेली पंधरा दिवस नदीच्या पात्राची रुंदी व खोली वाढविण्याचे काम सुरू आहे. खेमावती नदीच्या स्वच्छता करण्याची मागणी गेल्या एक वर्षापासून केली जात होती. मागील वर्षीच्या पावसाळ्यात ढगफुटीसदृश पावसात पुरामध्ये दोघाजणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तेव्हापासून अनेक सामाजिक संघटनाकडून या नदीच्या स्वच्छतेची मागणी केली जात होती. लोणंद येथील प्रसिद्ध डॉक्‍टर नितीन सावंत व त्यांचे सहकारी यांनी सततच्या केलेल्या प्रयत्नामुळे नदी स्वच्छतेला व त्याची रुंदी खोली वाढविण्याच्या कामाला यश आले आहे.

सध्या या कामासाठी बारामती ऍग्रोने एक पोकलेन व एक जेसीबी विना मोबदला दिला असून यासाठी लागणारे डिझलचा खर्च लोकसहभातून चालू आहे. दि. 6 पासून सुरु झालेल्या या मोहीमेसाठी दररोज अठरा हजार रूपयांचे डिझेल लागत आहे. सुरुवातीला काही मोजक्‍या लोकांनी यासाठी मदत केली. डिझेलला पैसे नसल्याने काम बंद पडू नये म्हणून गेली दहा दिवस डॉ. नितीन सावंत हा खर्च स्वतः करीत होते. त्यांच्या जोडीला त्यांचे सहकारी गजेंद्र मुसळे यांनीही या कामासाठी गेली आठ दिवस झाले पोकलेन मोफत दिला आहे.

सध्या लोणंदमध्ये वाहणाऱ्या खेमावती नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात असून विविध सामाजिक संघटना, मंडळे यांच्याकडून मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नदीच्या एका बाजुला शिरवळ रोड ते खंडाळा रोड बायपास रस्ता, नदी पात्राच्या कडेने वृक्षारोपण, सुशोभीकरण करण्यात येणार असून त्यामुळे लोणंदच्या वैभवात भरच पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)