विश्‍वास निर्माण केल्याने जनता आपल्या पाठीशी : डॉ. विखे

राहुरी – ऊसउत्पादक शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय, परिसरातील सामाजिक कार्यामध्ये योगदान, तसेच विखे कुटुंबीयांवर असलेला विश्‍वास, यामुळे आपण मतदारांमध्ये विश्‍वास निर्माण करू शकलो. याच विश्‍वासाच्या जोरावर राहुरी तालुक्‍यासह संपूर्ण मतदारसंघ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन भाजप लोकसभेचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

वांबोरी येथे आयोजित प्रचार सभेते डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी खडांबा नाका येथून ढोल-ताशांच्या गजरात प्रचार फेरीला सुरुवात झाली. यावेळी आ. शिवाजी कर्डिले, ज्येष्ठ नेते ऍड. सुभाष पाटील, डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, राहुरी तालुक्‍यातील बंद पडलेली कामधेनू सुरू करून हजारो कर्मचारी, शेतकरी, सभासद, ऊसवाहतूक, तोडणी कामगार यांच्या घरातील चूल पेटवण्याचे काम केले.

मतदारसंघामध्ये सामाजिक कार्यात सहभाग घेऊन मतदारांचा विश्‍वास प्राप्त केला आहे. त्यामुळेच मतदारसंघातील मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे संचालक सूरसिंग पवार, वांबोरी ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र पटारे, भानुदास कुसमुडे, मनोज बिहाणी, आबा पाटील, प्रमोद गांधले आदींसह हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)