मायबाप जनतेने विश्वास सार्थ ठरवला – डॉ. कोल्हे

पुणे – शिरूर लोकसभा निवडणूक हातात घेतली आणि विजयाचा कौल दिला, त्या माझ्या माय-बाप मतदारांना वंदन करतो. असा भावना राष्ट्रवादी कॉग्रेसचे निवडून आलेले उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त करत, या विजयामध्ये आदरणीय शरद पवार यांच्यासह पक्षातील पदाधिकारी आणि शिरूर मतदार संघातील स्थानिक नेतृत्व व कार्यकर्ते यांचा मुख्य वाटा आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

डॉ. अमोल कोल्हे यांनी पहिल्या फेरीपासून अघाडीवर राहत, साधारण दहाव्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर मात करत तब्बल 25 हजारांच्या पुढे मताधिक्‍य मिळवत विजयाची वाटचाल सुरू ठेवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण सुरू झाले. डॉ. कोल्हे बालेवाडी येथे येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नियोजन तसेच दिलीप वळसेपाटील, अतुल बेनके, सत्यशील शेतकर, संजय काळे, विवेक वळसेपाटील, पाचुलकर, प्रदीप कंद, अशोक पवार, सांगळे, चेतन तुपे, दत्ता साने, विलास लांडे, मंगलदास बांदल यासह अन्य स्थानिक नेतृत्वांनी झटून काम केले. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीचे आजी-माजी सदस्य आणि कार्यकर्ते यांनी मोलाचे काम केले.

मराठा-माळी या वादाबाबत विचारले असता डॉ. कोल्हे म्हणाले, आजचा तरूण अशा पध्दतीच्या वादांना जुमानणार नाही, असा मला विश्‍वास होता. तो विश्‍वास माय-बाप जनतेने सार्थ ठरवला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. आंबेगाव तालुक्‍यातील आघाडीचे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे श्रेय अधिक आहे. सगळ्यांची एकजुट आणि एकदिलाने सर्वांनी बळ दिल्यामुळे हा विजय झाला. यापुढे मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि समोर असलेली अश्‍वासनांची पुर्तता करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिल.

दिलेल्या शब्दानुसार मतदारसंघात वेळ देणार
मालिका आणि मतदारसंघ यामध्ये कशा मेळ घालणार. याबाबत कोल्हे यांना विचारले असता, प्रचार आणि मालिका या दोन्ही गोष्टी होवू शकतील, हे प्रसारमाध्यमांनीच दाखवून दिले. त्यानुसार या दोन्ही गोष्टी सुरू राहतील. मालिका हे आपल्या महाराजांचे काम आहे, हा इतिहास समोर येणार असून, ते काम पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. त्याचबरोबर प्रचारावेळी माझ्या मतदारांना शब्द दिल्याप्रमाणे मतदारसंघातही वेळ देणार, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here