थेरगावात आरोग्य विभागाची तिघांवर कारवाई
पिंपरी – महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. थेरगाव येथे मोकळ्या भूखंडावर बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्या 3 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याअंतर्गत महापालिकेचे भरारी पथक ऑन द स्पॉट दंडात्मक कारवाई करीत आहे. आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक आर. एम. बेद, एस. बी. पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत थेरगावात तिघांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या 12 जणांकडून 9 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अधिक माहिती देताना महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय म्हणाले की, शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील आरोग्य विभागामार्फत कारवाई केली जात आहे. महापालिकेकडून वारंवार आवाहन करुनही शहराच्या विद्रुपीकरणात काही नागरिक भर घालीत आहे. असे नागरिक आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरात सर्वच भागात कारवाई सुरू असून कारवाईच्या ठिकाणी काढलेली छायाचित्रे आरोग्य विभागाच्या फेसबूक पेजवर देखील टाकली जात आहेत. नागरिकांनी शहर स्वच्छ राखून कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.