पिंपरी : ज्योत्स्ना शिंदे यांची बदली लांबणीवर

पिंपरी -आपल्या कार्यशैलीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना दिलासा मिळाला आहे. आचारसंहितेमुळे शिंदे यांच्या बदलीचा प्रस्ताव रखडला आहे. तर याच प्रकरणी महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीशीचा त्यांचा खुलासा संयुक्‍तिक नसला, तरीदेखील त्यांना महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी केवळ सक्‍त ताकीद देत, एकवेळ संधी दिली आहे. कार्यशैलीबाबत पुन्हा तक्रार प्राप्त झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा त्यांना दिला आहे.

राज्य सरकारकडून प्रतिनियुक्‍तीवर आलेल्या महापालिका शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना पुन्हा शासन सेवेत परत पाठविण्याच्या विषय महासभेत मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वीच महासभेने शिंदे यांना शासन सेवेत पाठविण्याची उपसूचना मंजूर केली होती. महापालिकेच्या एकूण 105 शाळा असून, त्यामध्ये 1150 मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका कार्यरत आहेत. तर या सर्व शाळांमध्ये 38 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण समितीचा एवढा मोठा व्याप असताना, शिंदे या त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीत. त्यांच्या कार्यशैलीबात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.

शिंदे यांच्याकडून जबाबदारीची टाळाटाळ होत असल्याने, महापालिकेची प्रतिमा जनमाणसात मलिन होत असल्याच्या निष्कर्षापर्यंत शिक्षण समिती पोहोचली आहे. तसेच अशा सुमार कामगिरीमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या घटण्याची भीतीदेखील या समिती सदस्यांनी व्यक्‍त केली होती. दरम्यान, 7 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत सुवर्णा बुर्डे आणि शारदा सोनवणे यांनी शिंदे यांच्या मांडलेल्या बदलीच्या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार हा मंजूर प्रस्ताव महासभेच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुन्हा नव्याने मंजुर होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)