पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसीए) अर्थात पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने हवा गुणवत्ता तपासणी यंत्र भेट देण्यात आले आहे.
पिंपरी गाव मनपा शाळेत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये शहराचे महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थित हवा गुणवत्ता तपासणी यंत्राचे लोकार्पण करण्यात आले.
आयुक्तांनी यंत्राच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आदेश काढून ते यंत्र मोशी कचरा डेपोमध्ये तातडीने बसविण्याबाबत सूचित केले आहे . या मशीनची देखभाल व मालकी हक्क यापुढे महापालिकेचा राहील अशा आशयाचे पत्र इसीएकडून पर्यावरण विभागास देण्यात आले आहे .
पर्यावरण संवर्धनात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या तीन सामाजिक संस्थांचा सत्कार तसेच मनपाच्या कर्तव्य दक्ष चार सहायक आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार, सेवा निवृत्त दोन मनपा अधिकाऱ्यांचा सन्मान इसीए तर्फे करण्यात आला. शहरातील खाजगी व महापलिका शाळा मधून पर्यावरण उपक्रम स्पर्धा आयोजित केली होती त्याचा निकाल जाहीर करून 13 शाळांना सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार महापौर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त आशा दुरगुडे, शिक्षणाधिकारी पराग मुंडे, निवृत्त अति आयुक्त दिलीप गावडे , इसीए संस्थापक अध्यक्ष विकास पाटील, पिंपळे पुरुषोत्तम, मीनाक्षी मेरुकर, सुनीता जुन्नरकर आदी उपस्थित होते.
आयुक्त यांनी जाहीर केलेल्या 150 000 वृक्ष लागवडीच्या लक्ष्यपूर्तीसाठी इसीए महापालिका प्रशासनासोबत कार्यरत राहणार असल्याचे यावेळी इसीए अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनघा दिवाकर यांनी केले व अंजना सोनावणे यांनी आभार व्यक्त केले.