अधिकाऱ्यांच्या बैठकीत घुसले कामगार ः थेट व्यवस्थापकीय संचालकांची घेतली भेट
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
-उपोषण करणाऱ्या 14 कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे.
-या कामगारांना पाठिंबा देणाऱ्या 16 कामगारांना एक महिन्याचे निम्मे व 3 कामगारांना एका महिन्याचे पूर्ण वेतन देण्यात यावे.
-या सर्व 16 कामगारांचे थकीत वेतन 20 जून 2019 रोजी दिले जाईल.
-थकीत वेतनाबाबतची माहिती महामेट्रोला 20 जून 2019 रोजी सादर करावी.
-सर्व कामगारांचे थकीत वेतन 30 जूनपर्यंत ठेकेदाराने अदा करावे.
-काम केलेल्या मात्र, रेकॉर्ड उपलब्ध नसलेल्या कामगारांनादेखील वेतन देणार.
-आजपर्यंत 88 लाख रुपये कामगारांचे वाटप केले असून,
अजूनही सुमारे 75 लाख रुपये देणे बाकी आहे.
पिंपरी – महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकविणाऱ्या ठेकेदाराची तक्रार थेट महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितांकडे करण्यात आली आहे. मेट्रोच्या कामांबाबत सुरू असलेल्या बैठकीत घुसून कामगारांनी वेतनाची मागणी केली. याची दखल घेत, येत्या 30 जूनपर्यंत या सर्व कामगारांचे थकीत वेतन देण्याचे आदेश दीक्षित यांनी ठेकेदाराला दिले आहेत. त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त करत नियोजित दोन्ही आंदोलने स्थगित करण्यात आली आहेत. उल्लेखनीय बाब अशी की, जिथे या वर्षाच्या अखेरीपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे दावे करण्यात येत आहेत, त्याच भागामध्ये ठेकेदार कंपन्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आंदोलनांची नामुष्की मेट्रोला सहन करावी लागत आहे.
मेट्रो स्टेशनची उभारणी करणाऱ्या एचसीसी अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीमध्ये काम करणाऱ्या 100 कामगारांचे वेतन डिसेंबर 2018 पासून थकीत आहे. यातील काही कामगारांना एक-दोन महिन्यांचे वेतन देऊन त्यांना कामावरुन काढण्यात आले होते. कामगार दिनापासून कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले होते. 3 मे रोजी कामगारांचे वेतनाची काही रक्कम देण्यात आली होती. तसेच 17 व 31 मे 2019 अशी दोन टप्प्यात कामगारांच्या वेतनाची रक्कम लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण सोडले होते. कंपनीने शब्द न पाळल्यामुळे 1 जून 2019 रोजी 14 कामगारांनी उपोषण आंदोलन पुन्हा सुरु केले होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित फुगेवाडी कार्यालयात आल्याची माहिती मिळाल्याने, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी गुरुवारी (दि.6) थेट महामेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयावर धडक मारली. त्यावेळी दीक्षितांची अधिकारी व ठेकेदारांसोबत बैठक सुरु होती. दोन तास वाट पाहूनही दीक्षितांची भेट घेऊ न दिल्याने कामगारांनी थेट बैठकीच्या हॉलमध्ये घुसून जाब विचारला. दरम्यान कामगार व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दीक्षितांनी सुरू असलेली बैठक बरखास्त करुन कामगारांसोबत दुसऱ्या हॉलमध्ये बैठक घेतली.
या बैठकीत मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी, कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, अति. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक रणजित कुमार तर एचसीसी अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर अनिल बिराजदार, मयूर आसवानी उपस्थित होते. तर कामगारांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, अभिजीत भास्करे, विनोद भालेराव, प्रभाकर माने, सुजित चव्हाण, केदार घाटपांडे, कृष्ण कुमार, अरुण गायकवाड, तुकाराम जोगी, पवन बिराजदार आदी उपस्थित होते.