प्राथमिक शिक्षण संचालकांचे आदेश
पुणे – राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन रमजान ईदपूर्वीच अदा करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजाविले आहेत. राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 1 तारखेलाच वेतन मिळावे, अशी मागणी राज्य शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. त्याची दखल घेत शासनाने संबंधित विभागांना वेळेवर वेतन अदा करण्याबाबतचे आदेशही बजाविण्यात आले आहेत.
काही जिल्ह्यांमध्ये त्यांची गांभीर्याने अंमलबजावणीच केली जात नसल्याचे आढळून येते. काही तरी तांत्रिक अडचणीची कारणे पुढे करुन वेळेवर वेतन देण्याचे टाळण्यात येत असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. सण, उत्सवाच्या काळातही नियमित वेतन मिळत नसल्याबाबत बऱ्याचदा नाराजी व्यक्त करण्यात येते. येत्या 5 जूनला रमजान ईद आहे. यापूर्वीच 1 जूनला वेतन देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेने प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांच्याकडे केली आहे. त्यावर या संचालकांनी त्याची दखल घेऊन शिक्षण उपसंचालक, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक आदींना वेतन ईदपूर्वीच देण्याचे आदेश दिले आहेत.