सदस्यांची अधिकाऱ्यांना सूचना : सर्वसाधारण सभा
पुणे – जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सादर झाले. अर्थ विभागाने त्याचे योग्य नियोजन केले; परंतु दरवर्षी जिल्हा परिषदेचे उत्पन्न कमी होत असताना दिसत आहे. त्यामुळे वाढत्या अंदाजपत्रकाबरोबरच जिल्हा परिषदेचे उत्पन्न कसे वाढेल याकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे, अशा सूचना जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा परिषदेचे यंदाचे मूळ अंदाजपत्रकासह पुरवणी अंदाजपत्रक 421 कोटी 50 लाख रुपयांचे आहे. हे अंदापत्रक सर्वसाधारण सभेपुढे अवलोकनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी अंदाजपत्रकातील प्रत्येक विभागासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली याची माहिती सदस्यांना देण्यात आली. त्यावेळी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा मुद्दा उपस्थित केला. भाजपा गटनेते शरद बुट्टे म्हणाले, जिल्हा परिषदेला येणाऱ्या इमारतींचे भाडे दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक भाडी थकलेली आहेत. राज्यात जिल्हा आरोग्य विभाग अव्वल स्थानी आहे. मात्र, दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडींची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यासाठी आरोग्य केंद्रांची सुधारणा होणे आवश्यक आहे, पुरेसे डॉक्टर पाहिजेत, असा सूचना बुट्टेपाटील यांनी केली.
अतिक्रमणाबाबत अधिकारी अनभिज्ञ
जिल्हात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. त्या जागांवर काहींनी अतिक्रमण केले असून अधिकाऱ्यांना त्याबाबत माहितीही नाही. असा गौफ्यस्फोट करत सदस्य वीरधवल जगदाळे यांनी केला. अतिक्रमण केलेल्या जागा तत्काळ ताब्यात घ्यावा. त्यामध्ये काही शाळांच्या जागेवरही अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या जागांवार जिल्हा परिषदेच्या व्यवसायाच्या दृष्टीने बांधकाम करावे, जेणेकरून उत्पन्न वाढीला त्याची मदत होईल.