पवारांची माघार (अग्रलेख)

राजकारण धुरंदर नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे काल स्पष्ट केले. निवडणूक रणधुमाळीची सुरुवातच त्यांच्या राजकीय माघारीच्या बातमीने झाल्याने त्यातून विनाकारण एक वेगळा आणि चुकीचा संदेश गेला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी असा निर्णय घेऊन स्वत:च्या पक्षाविषयी आणि आघाडीच्या यशाविषयीच साशंकता निर्माण केली आहे असा निष्कर्ष यातून कोणी काढणार असेल तर तो चूक म्हणता येणार नाही. मुळात पवार हे निवडणुकीच्या राजकारणातून सन 2014 रोजीच निवृत्त झाले होते.

आपण 50 वर्षे निवडणुकीच्या राजकारणात आहोत, तब्बल 14 निवडणुका लढवून आपण त्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत, पण आता निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होण्याचा निर्णय आपण घेतला असल्याची घोषणा त्यांनी त्यावेळी केली होती. अर्थात त्यावेळी त्यांना मोदी लाटेची पूर्ण कल्पना आली होती म्हणूनच त्यांनी तसे केल्याची चर्चा बरेच दिवस रंगली होती. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत त्यांनी अचानक माढ्यातून उभे राहण्याचे संकेत दिले. आपल्याला कार्यकर्त्यांकडून आग्रह होत आहे असे ते म्हणाले होते. त्यांच्या या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसवर विधायक परिणाम झाला होता व कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा पवारांनी घुमजाव करीत माढ्यातून माघार घेण्याच्या निर्णयातून भाजपला आयतेच कोलीत मिळाले आहे. पाकिस्तानवरील हल्ल्याच्या प्रकारामुळे देशात पुन्हा मोदी सत्तेवर येण्याची चिन्हे दिसू लागल्याने आणि त्या वावटळीत निवडून येण्याची शाश्‍वती नसल्यानेच पवारांनी माघार घेतली असे उघड दावे केले जाऊ लागले आहेत. त्याला स्वत: पवारच जबाबदार ठरले आहेत. मुळात त्यांनी आधी निवडणूक लढवण्याची तयारीच दर्शवायला नको होती आणि एकदा तयारी दर्शवल्यानंतर त्यांनी त्यातून माघार घ्यायला नको होती असे त्यांच्या समर्थकांचेही खासगीतील म्हणणे आहे. पवार आपल्या कोणत्याही निर्णयाचा युक्‍तिवाद समर्पक पद्धतीने करतात. लोकांच्या तो गळी उतरतो. माढ्यातून माघारीचा निर्णय घेताना त्यांनी जी पार्श्‍वभूमीव विशद केली आहे ती समर्पक होती. मावळमध्ये पवार घराण्यातल्याच पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय झाल्यानंतर आपण स्वत: माढ्यातून निवडणूक लढवणे योग्य नाही. कारण एकाच घरात इतक्‍या जणांना उमेदवारी देणे संयुक्‍तिक ठरत नसल्याने आपण माघार घेऊन नव्या पिढीकडे राजकारण सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याचा युक्‍तिवाद त्यांनी केला आहे.

एका उदात्त भूमिकेतून आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी भासवले असले तरी यावेळी मात्र त्यांच्या युक्‍तिवादाचा फार प्रभाव पडलेला दिसला नाही. उलट त्यांच्या माघारीचा निर्णय म्हणजे भाजप-सेना युतीच्या विजयाचीच ग्वाही असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी दिली आहे. लोक आता असेच बोलत राहणार आहेत. त्यामुळे या राजकारण धुरंदर नेत्याची यावेळीची ही खेळी मात्र स्वत:च्याच पक्षासाठी हानिकारक ठरली आहे असे म्हणावे लागते. आधी होकार द्यायचा आणि नंतर माघार घ्यायची ही त्यांच्या राजकारणाची तऱ्हा महाराष्ट्राला नवीन नाही. पवार साहेबांच्या अशा राजकीय घुमजावाची अनेक उदाहरणे महाराष्ट्राला ज्ञात आहेत. आज पवार कॉंग्रेस बरोबर असले तरी उद्या त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली आणि त्यात भाजपचे पारडे जड दिसले तर ते कॉंग्रेसशी फारकत घेऊन थेट मोदींचा हात धरण्यासही ते कचरणार नाहीत याचाही अंदाज अनेक राजकीय निरीक्षकांना आहे. त्रिशंकू अवस्थेत त्यांनी आपल्या पक्षाचे सर्व पर्याय खुले ठेवण्याची भूमिका या आधीही बऱ्याचवेळेला घेतली होती. याही वेळा ते तसा निर्णय घेणार नाहीत असे कोणीही खात्रीशीर सांगू शकणार नाही. त्यांच्या पक्षाला जागा कितीही मिळोत पण स्वत:चे राजकीय महत्त्व कमी होणार नाही याची दक्षता घेणारे ते एक राजकीय चाणाक्ष नेतृत्व आहे. तत्त्वनिष्ठ राजकारण्यांच्या दृष्टीने ही एक राजकीय लबाडी असते पण पवारांनी मात्र अशा प्रकारच्या राजकारणाला व्यावहारिक भूमिकेचा मुलामा दिला आहे.

राजकीय अस्थिरता परवडणारी नसते, त्यामुळे राजकीय स्थिरतेसाठी आपण अशा भूमिका घेत असतो असे त्यांचे नेहमीचे सांगणे असते. पण आता वयाच्या या टप्प्यात त्यांना अशा भूमिका शोभून दिसतात का? हा सध्या उपस्थित होणारा प्रश्‍न आहे. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी केव्हाच पार केली आहे. आज ते 80 च्या दिशेने वाटचाल करीत आहेत. शारीरिक व्याधींचाही त्रास आहेच. अशा स्थितीत त्यांची कार्यक्षमता कौतुकास्पद असली तरी धरसोडीच्या राजकीय स्वभावामुळे मात्र त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचते आहे हे नाकारता येणार नाही.

पवारांनी निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्‍त करणे याचा अर्थ मोदी पराभूत होणार आहेत आणि कडबोळ्याच्या राजकारणात पवारांना पंतप्रधानपदाच्या दिशेने हालचाल करण्याची संधी मिळणार असा लावला गेला होता. पण आता ही संधी उपलब्ध नाही अशी कबुलीच माघारीच्या निर्णयातून पवारांनी दिली आहे हा विरोधकांचा युक्‍तिवाद अमान्य करता येत नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित राजकीय नेतृत्व आहे. राज्याच्या विकासातील त्यांचे बहुमूल्य योगदान नाकारता येत नाही. पाच दशकातील त्यांच्या या यशस्वी राजकीय कारकिर्दीला धरसोडीच्या राजकीय धोरणाचे गालबोट लागणे रुचणारे नाही.

Ads

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला पवार साहेबानी माढा मधून निवडणूक लढविणार नाही असे म्हंटले आहे मी आता कोणतीच निवडणूक लढविणार नाही असे म्हंटलेले नाही तेव्हा त्यांच्यासाठी माघार हा शब्द योग्य वाटत नाही ते इतर मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांचा हुकमी मतदार संघ ऐन वेळी जरी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली तरी ते हमखास निवडून येणारच सध्याचे राजकारण बघता यदादाकदाचित एकाही पक्षाला निर्भेळ बहुमत मिळाले नाही व काही संख्यांची गरज पडलीच तर पवार साहेब मोठ्या मानाने बहुमत सिद्ध करण्यासाठी त्या पक्षाला पाठिंबा देतील व त्यासाठी राष्ट्रपती पद हे त्यांना मिलनाची शक्यता नाकारता येत नाही त्यांच्या वयाचा अनुभवाचा व राजकीय कारकीर्द विचारात घेता श्री मोदी हे पद त्यांना देण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास हा त्यांचा बहुमानच समजावा लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)