पवारांची “पॉवर’ हद्दपार

राष्ट्रवादीला “रिस्क’ अंगलट ः वंचित बहुजन आघाडी, नोटाने बिघडवले गणित

जगतापांची साथ ठरली सार्थ

दुसरीकडे पवार घराण्यातील तिसरी पिढीच समोर असल्याने बारणे यांच्यासाठी हे यश मिळविणे बारणे यांच्यासाठी सोपे नव्हते. परंतु, त्यांनी केलेली नियोजनबद्ध आखणी फळाला आली. जिल्हाप्रमुखांपासून ते शाखा प्रमुखांपर्यंतचे जाळे त्यांनी आपल्या नियंत्रणात ठेवले होते. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व बारणे यांच्यात टोकाचे वैर होते. परंतु, ते संपुष्टात आणण्यात त्यांना यश आले. एवढेच नव्हे तर लक्ष्मण जगताप हे बारणे यांच्या विजयातील मोठे वाटेकरी ठरले आहेत. मोदींसाठी शिवसेनेला विजयी करा, असे आवाहन सुरुवातीपासून करीत खुबीने मोदींच्या नावाचा वापर केला. घराणेशाहीचा आरोप करीत “ग्लोबनिती’चा अवलंब केला. त्यामुळे थेट पवारांविरोधात खिंड लढताना बारणेंनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंचित बहुजन आघाडीचा फटका

वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते 75 हजार 904 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजाराम पाटील यांना सहापैकी पनवेल मतदार संघातून 15 हजार 996, चिंचवडमधून 17 हजार 794, तर पिंपरी विधानसभा मतदार संघातून 17 हजार 794 मते मिळाली आहेत. त्याचा थेट फायदा शिवसेनेचे बारणे यांना मिळाला. याखेरीज “नोटा’ला 15 हजार 548 मते मिळाली. मावळात “नोटा’चा सर्वाधिक वापर झाला आहे.

पिंपरी  – स्थानिकांना डावलून लादलेला उमेदवार, प्रचार यंत्रणेत स्थानिकांवर दाखविलेला अविश्‍वास, प्रचारात विकास कामांच्या मुद्‌द्‌यांचा अभाव, मित्र पक्षांची मोट बांधण्यात आलेले अपयश यामुळे पार्थ पवार यांच्या “लॉंचिंग’ची “रिस्क’ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अंगलट आली आहे. तब्बल दोन लाखांच्या मताधिक्‍क्‍याने पराभवाची नामुष्की ओढावल्याने पिंपरी-चिंचवडसह आता मावळातूनही पवारांची “पॉवर’ हद्दपार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे अख्खे पवार कुटुंब विरोधात उतरले असताना बारणे यांना मिळालेले यश उल्लेखनीय ठरले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांच्यासह 21 उमेदवार रिंगणात होते. मागील लोकसभा निवडणुकीत मतदार संघाबाहेरील उमेदवार लादून पराभव ओढावून घेतल्यानंतर यावेळीही राष्ट्रवादी कॉंग्रेसने घोडचूक केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे अनेक इच्छूक असताना स्थानिकांना डावलून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्याच मुलाला याठिकाणी उमेदवारी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही पार्थ यांना विरोध असल्याची चर्चा होती.

पक्ष संघटनेत कोणतेही काम केले नसताना थेट लोकसभेच्या रिंगणात पार्थ यांना उतरविण्यात आले. त्यामुळे त्यांची पहिल्याच भाषणात भंबेरी उडाल्याचे पहायला मिळाले. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी “नको त्या उठाठेवी’ त्यांनी केल्या. त्यामुळे प्रसिद्धी मिळण्याऐवजी नकारात्मक वातावरण तयार होत गेले. त्यात घराणेशाहीचा धोशा विरोधी उमेदवारांनी शेवटपर्यंत लावून धरला. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यातच वेळ व्यर्थ घालविल्याने पार्थ यांच्याकडून मतदारांसमोर कोणतेही नवीन मुद्दे आले नाहीत. विकासाचा अजेंडा त्यांना मतदारांसमोर ठेवता आला नाही.

प्रचार यंत्रणेतील विस्कळीतपणा सुरुवातीपासून जाणवत होता. आता पवारांच्या तिसऱ्या पिढीच्याही सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रचार यंत्रणेतून अंग काढून घेतले. पार्थ पवार यांच्यासोबत फिरुन फोटोसेशन करण्यातच त्यांनी धन्यता मानली. परिणामी स्वतः आप-आपल्या भागातील प्रचार यंत्रणा ताब्यात घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभाव दिसला.

एवढेच नव्हे तर आर्थिक बाबींमध्ये स्थानिकांवर अविश्‍वास दाखविण्यात आला. शरद पवार रस घेत नसल्याचे पाहून जुने कार्यकर्तेही प्रचारापासून दूर असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे शरद पवार वगळता अख्खे पवार कुटुंब प्रचारार्थ उतरुनही पार्थ यांचा पराभव रोखता आला नाही. उरण विधानसभा मतदार संघाचा अपवाद वगळता उर्वरीत सर्वच मतदार संघांकडून पार्थ यांची दारुण पिछेहाट पहायला मिळाली. त्यातच शेकाप व कॉंग्रेसची आघाडी म्हणून साथ मिळाली असली तरी त्यांना सोबत घेवून प्रचार करण्यात राष्ट्रवादीचे नेते कमी पडले. मनसेने मदतीसाठी हात पुढे केला होता. तरीही त्यांचा म्हणावा तसा वापर करुन घेता आला नाही. सुरुवातीपासून पवार या आडनावावर विजय मिळवू हा आत्मविश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसला नडला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)