सोक्षमोक्ष: पवार वा गडकरी पंतप्रधान होऊ शकतील?

हेमंत देसाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अद्याप कायम आहे की नाही, अशा चर्चेला उधाण आले असून, त्यामुळे 2019 नंतर पंतप्रधान कोण असेल, याचे उत्तर जो तो आपापल्या पद्धतीने शोधू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 200 पेक्षा कमी जागा मिळाल्यास, अन्य प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि अशावेळी मोदी यांच्याऐवजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती दिली जाईल, असा एक सर्वसाधारण मतप्रवाह आहे. त्याचवेळी भाजपविरोधी महागठबंधनासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. एकाच वेळी महाराष्ट्रातून पंतप्रधानपदासाठी दोन दोन नावे पुढे येणे, हे बहुधा प्रथमच घडले असावे.

“नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आले आहे, त्याचा आपणास आनंदच आहे. कारण ते आपले मित्र आहेत; परंतु आता आपणास त्यांची काळजी वाटू लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. “भाजपमध्ये मोदी कोणालाही फार मोठे होऊ देत नाहीत. त्यामुळे गडकरी यांनीही जपून बोलावे आणि वागावे’, असा मित्रत्वाचा सल्ला देण्याचा पवित्रा पवार यांनी घेतलेला दिसतो. परंतु मोदी आणि गडकरी यांच्यातील अंतर वाढण्यासाठी केलेली ही व्यूहरचनाही असू शकते. पवार राज्यसभेचे खासदार आहेत. आपण यापुढे कधीही लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे पवार यांनी पूर्वीच जाहीर केले होते. परंतु गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच अजित पवार व छगन भुजबळ यांनी, “शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी’, अशी मागणी केली.

माढाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशीही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. पवार उमेदवार असल्यास, त्यास आपली काहीही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हरकत घेऊन काहीएक उपयोग नाही, उलट आपल्याला त्रासच होऊ शकतो, हे विजयसिंहांना पूर्वानुभवावरून माहीतच असेल. वास्तविक माढा येथून निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी देण्याची मागणी होती. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी या नावास समर्थन व्यक्त केले होते. आता “उमेदवारी मिळतच नसेल, तर देशमुखांपेक्षा पवारांनाच पाठिंबा देऊन मोकळे व्हावे’, अशी (सोयीची) भूमिका मोहिते-पाटील यांनी घेतली आहे. पवार हे लोकसभा निवडणुकीस उभे राहिल्यास, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण होईल, हे खरेच आहे. त्याचा आता आसपासच्या मतदारसंघांवरही परिणाम हेऊ शकेल. परंतु पवार यांनी वय आणि प्रकृतीचा विचार करून लोकसभेची निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पण, माझ्या प्रकृतीची चिंता भाजपवाल्यांनी करू नये, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्‍त केली आहे. पण स्वतः पवार मात्र गडकरींच्याबद्दल काळजी व्यात करतात, त्याचे काय?

वर्ष 2014 मध्ये पंतप्रधानपदासाठी मनोहर पर्रीकर यांचेही नाव चर्चेत होते. त्यामुळे या पदासाठी मोदींचे नाव सुचवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवून, त्यांचा काटा काढला गेला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्रिपद सोडून पर्रीकर संरक्षणमंत्री झाले. परंतु राफेल घोटाळ्याचा त्यांना फारच वास येऊ लागला, तेव्हा त्यांची रवानगी गोव्यात करण्यात आली. “राफेलचे व्यवहार परस्पर पंतप्रधानांमार्फत करण्यात आले, आपणास त्याची काहीही कल्पना देण्यात आली नाही’, असेही ते म्हणाले होते. गेल्या काही महिन्यांत गडकरींनी केलेल्या काही वक्‍तव्यांवरून, ते मोदी, तसेच पक्षनेतृत्वावर टीका करत असल्याचे चित्र निर्माण झाले. राजकारणात विशिष्ट संदेश द्यायचे असतील, तर सांकेतिक भाषेत बोलून, नंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असे बोलण्याची पद्धत आहे. गडकरींनीही या रिवाजाप्रमाणेच वर्तन केले. “मला पंतप्रधान व्हायचे आहे’, असे स्वतःच्याच तोंडाने बोलून कोणी आपले हसे करून घेत नसतो. “मला त्या पदात स्वारस्य नाही. मला माझ्या कुवतीपेक्षा जास्त मिळाले आहे’, असे गडकरींनी म्हटले आहे. वास्तविक कुवतीपेक्षा जास्त मिळाले आहे, याची मुळातच खात्री असेल, तर त्यापेक्षा अधिक काही मिळाल्यास, ते नाकारण्याचे कारण काय? उद्या तशी संधी मिळाली, तर पक्ष जी कोणती जबाबदारी देईल, ती मला घ्यावी लागेल, असे सांगण्यास गडकरी मोकळे असतील.

दुसरीकडे, “राज्यात युतीने 45 पेक्षा कमी जागा जिंकल्या, तर त्याला विजय म्हणता येणार नाही. 45 जागांमध्ये बारामतीचा समावेश असलाच पाहिजे’, असे आवाहन भाजप अध्यक्ष अमित शहा, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले. मात्र शिवसेना भाजपबरोबर आल्याने, आहेत त्या जागा तरी टिकवता आल्या तरी पुष्कळ.

नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली. “राज्यावरील अन्यायाबाबत आम्ही चंद्राबाबूंसोबत आहोत, राजकारण होतच राहील’, अशी स्पष्टोक्‍ती राऊत यांनी यावेळी केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्यांना तिथे पाठवले होते. “युती न झाल्यास, सेना व भाजप दोघांचेही नुकसान होईल’, याची कबुली फडणवीस यांनी यापूर्वी दिलेली होतीच. त्यामुळेच 45 जागा जिंकण्याबाबतचा आत्मविश्‍वास त्यांनी कशाच्या भरवशावर व्यक्‍त केला, हे लक्षात घेतले पाहिजे.

“पवार यांनी कॉंग्रेसपुढे गुडघे टेकले’ असल्याची टीका रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. अचानकपणे भाजपवाले पवारांना टार्गेट करून बारामतीत त्यांना पराभूत करण्याच्या वल्गना करू लागले आहेत. “पवारांचे वय झाले आहे’, असे चंद्रकांत पाटलांना वाटते. परंतु 2014 मध्ये लालकृष्ण अडवाणींनी निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचे वय कमी होते का? बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजप प्रयत्नांची शर्थ करेल, यात शंका नाही. बारामतीत राष्ट्रवादीची कोंडी केली, तर पवार कुटुंब तेथेच अडकून पडेल, असे भाजपचे धोरण असेल.

प्रादेशिक पक्ष या नात्याने शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. शिवाय राष्ट्रवादीने मनसेला आपल्यासोबत घेण्याचे संकेत दिल्यामुळे शिवसेना नाराज आहे. राष्ट्रवादीच्या निवडून येणाऱ्या खासदाराची संख्या अत्यल्प असेल. त्यामुळे त्यांच्या जिवावर पवारांना पंतप्रधान बनता येणार नाही. राहुल गांधीच पंतप्रधान व्हावेत, अशी कॉंग्रेसजनांची इच्छा असून, ठिकठिकाणी ते तसे जाहीरपणे बोलूनही दाखवत आहेत. पवार वा गडकरी यांच्यासारखे नेते मोदी, राहुल गांधी वा प्रियांका गांधींच्या संख्यात्मक बलापुढे फिकेच ठरतात. नरसिंह राव, देवेगौडा व गुजराल हे पंतप्रधान होऊ शकले, मग पवार-गडकरी का होऊ शकणार नाहीत, हा सवाल बिनतोड आहे. परंतु तेव्हा राजकीय रिंगणात अन्य लोकप्रिय चेहरे नव्हते. आज तशी स्थिती नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)