सर्वांना सोबत नेण्याची ताकद पवारांकडेच – डॉ. अमोल कोल्हे

उरुळीकांचन – जर शेतकऱ्यांचे मरण हेच धोरण भाजप-शिवसेना सरकारचे असेल तर, अशा प्रवृत्तींना आता मतदानातून दाखवले पाहिजे. ज्या-ज्या वेळी हे सरकार सत्तेवर येते तेव्हा धार्मिक वाद आणि जातीय तेढ निर्माण केली जाते. स्थिर सरकार आणि सर्व जाती धर्मांना घेऊन जाण्याची धमक माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडेच आहे, असे विचार राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्‍यात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ठिकठिकाणी स्थानिक नेत्यांनी विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. फुलगाव, शिंदेवाडी येथील सभेत विकास लवांडे यांनी शेतकऱ्यांबाबत सरकार घेत असलेल्या दुटप्पी धोरणाला आक्षेप घेतला. यावेळी माजी आमदार दिलीप ढमढेरे, अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शंकर भूमकर, माणिकराव गोते, सुभाष जगताप, जि. प. सदस्या कल्पना जगताप, तुकाराम शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. विकास लवांडे म्हणाले, या फसव्या सरकारने शेतकऱ्यांचे जगणे असह्य केले आहे. कोरेगाव भीमाची दंगल कोणी घडवली? याचाही विचार केला पाहिजे. शेतमालाला हमी भाव नाही आणि या खासदारांच्या पक्षातील आमदार, खासदार राजीनामे खिशात घेऊन फिरतात पण देत नाहीत. खासदारांनीही संसदेत काय कामगिरी केली हेही संशयास्पद आहे, अशी टीका यावेळी अन्य वक्‍त्यांनी केली.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, 15 वर्षे झाली मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटत नसतील तर अशा खासदारांना काय म्हणायचे? रोजगार, विकासदराची घसरण, महागाई या मुद्द्यांचे काय झाले? आठवा त्या जाहिराती, किती खऱ्या किती खोट्या? याचा आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आता परिवर्तन घडलेच पाहिजे.

शिवसेनेला खिंडार
पिंपरीसांडसमध्ये शिवसेना शाखा अध्यक्ष रामचंद्र भोरडे, दीपक लोणारी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रविंद्र कंद, नंदू काळभोर, वाल्मिक भोरडे, माजी सरपंच बाळासाहेब भोरडे, सतीश भोरडे, मनसेचे हवेली उपाध्यक्ष संतोष कंचे, उपसरपंच दीपक लोणारी, माजी सरपंच शंकर मांडे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)